एक सन्मान सर्वोत्कृष्टतेचा..!

राजेश सोळसकर
सोमवार, 22 जुलै 2019

विकास ही एक प्रक्रिया असते. प्रतिकूलतेवर मात करता यायला जमलं, की विकास साधतो. अर्थातच प्रतिकूलतेशी लढा देणं, हे सातारकरांसाठी नवं नाही; किंबहुना लढणं हा त्यांच्या मातीचाच गुण आहे आणि त्याचे दाखले केवळ इतिहासातच शोधायची गरज नाही. अगदी वर्तमानातही आपण जर आजूबाजूला नजर टाकली, तर संघर्षावर मात करून उभी असलेली अनेक यशोशिखरे आपल्याला दिसतील.

विकास ही एक प्रक्रिया असते. प्रतिकूलतेवर मात करता यायला जमलं, की विकास साधतो. अर्थातच प्रतिकूलतेशी लढा देणं, हे सातारकरांसाठी नवं नाही; किंबहुना लढणं हा त्यांच्या मातीचाच गुण आहे आणि त्याचे दाखले केवळ इतिहासातच शोधायची गरज नाही. अगदी वर्तमानातही आपण जर आजूबाजूला नजर टाकली, तर संघर्षावर मात करून उभी असलेली अनेक यशोशिखरे आपल्याला दिसतील. 

वेगवेगळ्या क्षेत्रांत तयार झालेली ही यशोशिखरे म्हणजे आपल्यातीलच चालती-बोलती माणसे आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आहेत. यातील कुणी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उद्योग जगतात भरारी घेतली आहे, तर कुणी आपल्या व्यवसायाला क्षितिजापार नेऊन ठेवले आहे. हे साधत असताना या मंडळींनी केवळ आपलाच विचार न करता समाजालाही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाशी असलेली आपली नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही. आपण निर्माण केलेली विकासफळे इतरांनाही चाखता आली पाहिजेत, या विचारापासून ते कधीही दूर गेलेले नाहीत. कदाचित त्यांच्या प्रगतीचं हेच तर गमक असावं.

सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या अशाच काही उद्योजक-व्यावसायिकांचा एक मीडिया म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला आणि आम्ही पोचलो आपल्या जिल्ह्यातील ४२ व्यक्तींपर्यंत. प्रकाशाची बेटंचं जणू ती. अर्थातच अशी अनेक बेटं आपल्याला सातारा जिल्ह्यात आढळतील; पण आता कुठे आमचा प्रवास सुरू झाला आहे. यथावकाश तिथपर्यंतही पोचू. तूर्तास या ४२ जणांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचा, त्यांचे कार्य विस्तृतपणे इतरांपर्यंत पोचविण्याचा निर्णय ‘सकाळ’ने घेतला. एक माध्यम म्हणून त्यांच्या कर्तृत्वशाली हातावर सन्मानफुले ठेवल्यास या वाटेवर पुढे येऊ पाहणाऱ्या अनेकांसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असाही विचार आम्ही केला आणि त्यातूनच जन्म झाला ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्डचा!’

मळलेली वाट न निवडता स्वतःचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या या ४२ शिलेदारांच्या यशोगाथा आम्ही आजपासून पुढील काही दिवस दररोज प्रसिद्ध करणार आहोत. या यशोगाथा म्हणजे त्यांच्या यशाचा दिंडोरा नसेल. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन तर त्यात मुळीच नसेल. असेल फक्त त्यांच्या यशामागील अविरत कष्टांवर, संघर्षावर एक प्रकाशझोत. यशाची गाठ पडण्यापूर्वी त्यांना पादाक्रांत कराव्या लागलेल्या काट्या-कुट्यांनीयुक्त वाटांचा धांडोळा घेण्याचा हा एक प्रयत्न असेल. त्यांच्याप्रमाणेच वाटा उजळायला निघालेल्या पुढच्या पिढीला त्यांचा हा प्रवास मार्गदर्शक ठरावा, हाच केवळ यामागचा उद्देश... आणि तसंही मागाहून येणाऱ्यांसाठी कोणी तरी ‘टॉर्च बेअरर’ लागतोच ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excellence Award 2019