सोलापूर जिल्हा परिषदेची स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उल्लेखनीय कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

च्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पाणी व स्वच्छता विभागाच्या केंद्रीयमंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी तो पुरस्कार स्वीकारला. 

सोलापूर- स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पाणी व स्वच्छता विभागाच्या केंद्रीयमंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी तो पुरस्कार स्वीकारला. 

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, स्वच्छता व पेयजल विभागाचे प्रधान सचिव परम अय्यर, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्‍याम लाल गोयल, उपसचिव अभय महाजन उपस्थित होते. सोलापूर जिल्हा परिषदेने 95.55 गुण मिळवून देशात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली.

महाराष्ट्र स्वच्छतेचा अग्रेसर राहिल्याचे मत श्री. लोणीकर यांनी व्यक्त केले. जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सर्व अधिकारी जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी ऑनलाइन फीडबॅक व इतर स्वच्छतेच्या कामांमध्ये विशेष योगदान दिले. जिल्हा परिषदेस देश पातळीवरील सन्मान प्राप्त झाल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. मागील वर्षी आषाढी वारीच्यानिमित्त झालेल्या महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्व लोकांची नाळ जोडली गेली. त्याचाच परिणाम म्हणजे आपल्या जिल्ह्याला सन्मान मिळाल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. 

पंतप्रधानांकडून विशेष अभिनंदन 
राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात सातारा, सोलापूर व नाशिक जिल्ह्याचे विशेष अभिनंदन केले. देशातील प्रतिनिधींसमोर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मधील कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excellent performance in the clean survey of Solapur Zilla Parishad