कर्जतमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष

नीलेश दिवटे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथे मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी करीत जल्लोष केला.

कर्जत : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथे मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी करीत  जल्लोष केला. या वेळी "महाविकास आघाडीचा विजय असो,' "पवार साहेबांचा नाद नाय करायचा,' "जय भवानी- जय शिवाजी' अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, कॉंग्रेसचे नेते संतोष म्हेत्रे, जिल्हा उपाध्यक्ष तात्या ढेरे, तालुकाध्यक्ष काका तापकीर, सुनील शेलार, अशोक 
जायभाय, सरपंच काका शेळके, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे स्वप्नील तनपुरे, प्रदीप पाटील, कुशाभाऊ नेटके, प्रा. प्रकाश धांडे आदी या वेळी उपस्थित होते. 

फटाक्‍यांची आतषबाजी 
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदांचे राजीनामे दिले. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे 
सरकार स्थापन होणार असल्याच्या हालचाली दिसल्यानंतर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती चौकात फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी करीत, एकमेकांना पेढे भरवीत विजयाच्या 
जोरदार घोषणा दिल्या. 

हेही वाचा वैद्यकीय अधिकारी पाहिजे हो... 

औटघटकेचे सरकार संपुष्टात : फाळके 
फाळके म्हणाले, ""आज संविधान दिनाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील औटघटकेचे सरकार संपुष्टात आले. कितीही संकटे आली तरी त्यास न डगमगता धीराने सामोरे जायची शरद पवार यांची शिकवण आहे. आजची घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव आहे. देशातील एका नवीन पर्वाला सुरवात होत आहे. भाजपचा वारू रोखण्याचे काम केवळ पवारच करू शकतात. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहील. 

सोन्याचा दिवस उगवला : घुले 
घुले म्हणाले, ""आज संविधान दिनाच्या दिवशी आनंदाची बातमी सर्वांना समजली. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्षांचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांसाठी आज सोन्याचा दिवस उगवला आहे.'' 

अन्‌ सरकार कोसळले : म्हेत्रे 
म्हेत्रे म्हणाले, ""डरकाळी आणि दबंगगिरी करणारे व "आम्ही बहुमत सिद्ध करू' अशी फुशारकी मारणारे, अचानक अवतरलेले सरकार कोसळले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 
महाविकास आघाडी म्हणजे बळिराजाचे राज्य आले आहे.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excitement of the great development front in Karjat