विद्यमानांसह नातेवाईक पुन्हा मैदानात! 

विशाल पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

...हे आहेत विद्यमान सदस्य 

माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, दीपक पवार, विद्यमान अध्यक्ष सुभाष नरळे. 

...हे पतीदेव रिंगणात 
सुरेंद्र गुदगे, किरण बर्गे, हिंदूराव पाटील, मानसिंगराव जगदाळे, दादासाहेब काळे, दत्तात्रय अनपट.

सातारा - राजकारणातील सत्तेच्या सारीपाटावर कायम राहण्यासाठी जो तो राजकारणी प्रयत्न करतो. त्याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही येत आहे. चार विद्यमान सदस्य, तर 13 सदस्यांचे नातेवाईक पुन्हा मैदानात उतरले आहेत. लढण्यासाठी अनेक विद्यमान सदस्य इच्छुक असतानाही आरक्षणांमुळे बहुतेकांच्या अपेक्षांचा बट्याबोळ झाला आहे. 

जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रवेश करून राजकीय करिअरमध्ये स्थिरता आणण्यासाठी साताऱ्याच्या राजकारणात अनेकांनी पावले टाकली आहेत. ही पंचवार्षिक निवडणूक असल्याने दुसऱ्या फळीतील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांनी पुन:श्‍च हरिओम करण्यासाठी धावपळ सुरू ठेवली आहे. मात्र, पाच वर्षांनी बदलणाऱ्या आरक्षणांमुळे बहुतेकांची दांडी गुल केली आहे. तसे असले तरी काहींनी त्यावर "नातेवाईकां'चा उतारा दिला आहे. त्यामुळे या नातेवाईकांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवून पुन्हा "पती'राज किंवा "पत्नी'राज निर्माण केले जाणार आहे. 

भाजपचे नेते दीपक पवार यांचा एकमेव कुडाळ गट खुला राहिल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. तर, फलटणच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या नाईक-निंबाळकर राजघराण्यातील संजीवराजे, शिवांजलीराजे यांनीही मतदारसंघ बदलून उमेदवारी काम ठेवलेली आहे. विद्यमान अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या गटातील आरक्षण बदलले असले तरी त्यांनी बिदाल गटातून अर्ज दाखल केला आहे. परंतु, पक्ष त्यांनाच उमेदवारी देणार की अन्य कोणाला, हे सध्यातरी निश्‍चित नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माणिकराव सोनवलकर यांनी पत्नी साधना, सदस्य अनिल देसाई यांनी वहिनी सुवर्णा यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सदस्या मीनाक्षी काळे यांचे पती दादासाहेब काळे यांनीही अर्ज दाखल केला असला तरी तेथे कॉंग्रेसकडून अरुण गोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. फलटणच्या सारिका अनपट यांचे पती दत्तात्रय, शिरवळच्या स्वाती बरदाडे यांचे सासरे गुरुदेव बरदाडे, कोंडव्याचे संदीप शिंदे यांच्या पत्नी रेश्‍मा, कोरेगावच्या अर्चना बर्गे यांचे पती किरण, मायणीच्या शोभा गुदगे यांचे पती सुरेंद्र, मसूरच्या विजयमाला जगदाळे यांचे पती मानसिंगराव, ढेबेवाडीच्या मंदाकिनी पाटील यांचे पती हिंदूराव आदी जिल्हा परिषदेच्या लढाईत सामील झाले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्यही रिंगणात उतरले आहेत. मात्र, अर्ज माघारीनंतर किती जण लढणार, हेच महत्त्वाचे ठरेल. 

...हे आहेत विद्यमान सदस्य 

माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, दीपक पवार, विद्यमान अध्यक्ष सुभाष नरळे. 

...हे पतीदेव रिंगणात 
सुरेंद्र गुदगे, किरण बर्गे, हिंदूराव पाटील, मानसिंगराव जगदाळे, दादासाहेब काळे, दत्तात्रय अनपट.

Web Title: existing corporator with Relatives again in election