पंढरपुरातून पालख्यांचे आळंदीकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- . श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे हे यंदा सहावे वर्ष

- वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष केला

- फुलांनी सजविलेल्या रथात पालखी विराजमान

पंढरपूर : श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने संजीवनी समाधी सोहळ्यासाठी आज श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर संत नामदेवांच्या वंशजांच्या वतीने श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे हे यंदा सहावे वर्ष आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आज (बुधवार) दुपारी 1 वाजता श्री क्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ झाला.

प्रारंभी, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर जळगावकर व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सोहळ्याचे अधिपती विठ्ठल महाराज वासकर यांच्या हस्ते श्री पांडुरंग पादुकांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष केला.

 

यावेळी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, एकनाथ महाराज वासकर, गोपाळ महाराज वासकर, गोपाळराव गोसावी, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, श्री क्षेत्र देहू, आळंदी, पैठण, सासवड, त्र्यंबकेश्‍वर, मुक्ताईनगर या संस्थानचे प्रतिनिधी तसेच रामेश्‍वर उखळीकर महाराज, म्हातारबाबा संस्थानचे भगवानबाबा माळी, भागवत महाराज चौरे, बाळासाहेब यादव, रामभाऊ महाराज कदम, नामदेव महाराज लबडे, उद्धव महाराज लबडे, महेश महाराज भोसेकर, गोपाळ देशमुख, ज्ञानेश्‍वर भोसले, तुकाराम महाराज संस्थानचे काका चोपदार, काशीनाथ थिटे, सुदर्शन महाराज मंगळवेढेकर, विवेकानंद गोसावी, एकनाथ महाराज जळगावकर यांचा उपरणे व श्रीफळ देऊन मंदिर समितीच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख मयूर ननवरे, लेखाधिकारी सुरेश कदम, संजय कोकीळ आदींनी सन्मान केला.

मुख्य मंडपातून पालखी खांद्यावर घेऊन ती नामदेव पायरी प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आली. तुकाराम भवन, चौफाळा, श्री नाथ चौकमार्गे पुढे काढून ती फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exit Pandharpur towards Alandi