...या जगण्यातच आयुष्याचा खरा थरार

सुधाकर काशीद
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

कोल्हापूरच्या मेजर आर्चिस सबनीसचा अनुभव; रक्त गोठविणाऱ्या लेहमध्ये कार्यरत

कोल्हापूर -  मी मेजर आर्चिस दीपेन सबनीस आपल्या कोल्हापूरचीच. मी आता लेहमध्ये आहे. १२ हजार फूट उंचीवरील प्रदेशात. इथं वातावरण रक्त गोठून टाकणारं; पण आम्ही भारतीय जवान देशप्रेमाची एक रग जिवंत ठेवून रोज नव्या अनुभवाला सामोरे जातोय.

कोल्हापूरच्या मेजर आर्चिस सबनीसचा अनुभव; रक्त गोठविणाऱ्या लेहमध्ये कार्यरत

कोल्हापूर -  मी मेजर आर्चिस दीपेन सबनीस आपल्या कोल्हापूरचीच. मी आता लेहमध्ये आहे. १२ हजार फूट उंचीवरील प्रदेशात. इथं वातावरण रक्त गोठून टाकणारं; पण आम्ही भारतीय जवान देशप्रेमाची एक रग जिवंत ठेवून रोज नव्या अनुभवाला सामोरे जातोय.

मी तर लष्कराच्या इंजिनअरिंग विभागात. इथे या जानेवारी महिन्यात वीज आलीय. नाहीतर सगळं जनरेटरवरच चालायच. जवानांना लाईट, पाणी, रस्ते त्यांचा निवारा हे सारं पुरवायचं काम आमचंच. हे काम करताना खूप आव्हाने आहेत; पण खरं सांगू, असल्या आयुष्यालाच खरं थ्रिल आहे.
मेजर आर्चिस दीपेश सबनीस बोलत होत्या. त्या कोल्हापूरच्या प्रतिभानगरात राहाणाऱ्या. मनात जिद्द असली, की आपण काहीही करू शकतो याचेच त्या प्रतीक. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्या वाढल्या. शालेय शिक्षण मुक्त सैनिकमधल्या फुलोरा व सृजन आनंदमध्ये झाले. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगमध्ये बी. ई. मेकॅनिकल झाल्या; पण हे शिकत असताना कायम देशासाठी काही तरी वेगळे करायचा विचार बोलून दाखवायच्या. ताराराणीचा इतिहास वाचताना म्हणायच्या, नुसता वाचून काय उपयोग ताराराणीसारखं थोडं तरी जगायला नको का?

आणि त्यांनी मनातला हा विचार कृतीत आणला. आई किशोरी वडील दीपेन यांचे पाठबळ तर होतेच. त्यांनी २०११ मध्ये सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्डाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर आवश्‍यक प्रशिक्षण पूर्ण झाले व लेफ्टनंट पदावर त्या चीन सरहद्दीवर तवांग येथे हजर झाल्या. खूप दिवस मनात घर करून बसलेल्या एका आगळ्या वेगळ्या कर्तव्य भावनेला कृतीतून सामोरे गेल्या.

लष्कराच्या इंजिनिअरिंग विभागात त्या आता मेजर पदाव आहेत. जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या लेह या लष्करी तळावर (कारू) इंजिनिअरिंग विभागाची जबाबदारी सहकाऱ्यांबरोबर त्या सांभाळतात. जवानांना पाणी, लाईट, रस्ते व निवाऱ्याची सेवा देण्याचा त्यांचा विभाग २४ तास सज्ज असतो. सकाळी दहाला आल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आराम असा एखादाच दिवस त्यांच्या वाट्याला येतो. अर्थात कधीही कॉल आला की तयार, या तयारीनेच त्यांचा प्रत्येक दिवस उजाडतो व मावळतो.
कोल्हापूरच्या या आर्चिस सबनीस यांना कोल्हापूर, कोल्हापूरचा इतिहास, शिवाजी महाराज, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई यांचा खूप अभिमान. त्यांचे वडील दीपेन सबनीस शिरोलीच्या एस. बी. रिसेलर्सध्ये इंजिनिअर व आई किशोरी गृहिणी. त्यांना आर्चिस ही एकुलती मुलगी. वास्तविक एकुलती मुलगी म्हटल्यावर ती सतत आपल्या डोळ्यांसमोर असावी असा कोणत्याही आई-वडिलांची भावना; पण शिवाजी शेजाऱ्याच्या घरात नव्हे; पण आपल्या घरात जन्माला यावा अशी आर्चिसच्या आई-वडिलांची भावना आणि त्यांनी या भावनेतूनच आपल्या एकुलत्या आर्चुला लष्कर भरतीसाठी संमती दिली आणि आर्चू मेजर आर्चिस बनली.

मुलींनी थोडसं आपलं घर, आपलं गाव, आपला परिवार या पलीकडे पाहिले तर त्यांना नक्की वेगळी संधी आहे आणि आपण थोडीशी जिद्द मनात ठेवली तर ही संधी खेचू शकतो. जे मी केलयं ते फक्त मलाच शक्‍य आहे असे नाही. जिच्याजवळ जिद्द आहे त्या कोणत्याही मुलीला मेजर होणे फार मोठे अवघड नाही.
- मेजर आर्चिस सबनीस.

Web Title: experience in leh by aarshis sabnis

टॅग्स