दुष्काळी भागातील डाळिंबांची यंदाही युरोपला निर्यात

नागेश गायकवाड
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

आटपाडी - कोसळलेले दर, दुष्काळ, तेल्या, मर आणि करपा रोग अशी संकटे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेली. मात्र, या संकटाच्या मालिकेतही युरोप बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी जत आणि आटपाडी तालुक्‍यातील सुमारे साडेतीनशे शेतकरी सज्ज झाले आहेत.

आटपाडी - कोसळलेले दर, दुष्काळ, तेल्या, मर आणि करपा रोग अशी संकटे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेली. मात्र, या संकटाच्या मालिकेतही युरोप बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी जत आणि आटपाडी तालुक्‍यातील सुमारे साडेतीनशे शेतकरी सज्ज झाले आहेत.

देशांतर्गत बाजारपेठेच्या मर्यादा लक्षात घेऊन या शेतकऱ्यांनी निर्यातीकडे लक्ष केंद्रित केले असून, त्याचे दृश्‍य परिणाम म्हणजे केवळ आटपाडी तालुक्‍यात पाच हजार एकर क्षेत्र निर्यातक्षम डाळिंब लागवडीखालील आहे. जत आणि आटपाडी तालुक्‍यातून यंदा सुमारे २५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळेल, अशी आशा आहे. पणन महामंडळाने सुरू केलेल्या शीतगृहात यंदा प्रथमच साठवणुकीस प्रारंभ झाला.   

प्रदीर्घ काळ टेंभू सिंचन योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या आटपाडी तालुक्‍यात जस जसे पाणी पोहचतेय, तसे डाळिंबाचे क्षेत्र वाढतेय. सुमारे २० हजार एकर क्षेत्र लागवड झाली आहे. त्यात दरवर्षी भरच पडतेय. त्याचवेळी देशांतर्गत बाजारपेठेतील दर मात्र वाढत  नाहीत. एकीकडे दुष्काळाशी झुंज देऊन पिकवलेली डाळिंब बाजारपेठेत गेल्यानंतर मात्र कवडीमोल दराने विक्री होत आहेत. त्यामुळे अभ्यासू प्रयोगशील शेतकऱ्यांनी युरोपकडे मोर्चा वळवला. आता टेंभूच्या पाण्याची शाश्‍वती मिळू लागली तशी निर्यातीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. यावर्षी यात सुमारे हजारो एकर क्षेत्राची वाढ झाली. 

सध्या हंगाम सुरू असून स्थानिक बाजारपेठेत डाळिंबाचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. निर्यातक्षम डाळिंबाचा सरसकट दर प्रतिकिलो ८० रुपये, तर निवडक मालाचा दर १२० रुपयांवर आहे. जगभरात डाळिंबाची मोठी मागणी गृहीत धरता निर्यातीला मोठा वाव असून आजघडीला सुमारे तीनशेंवर उत्पादकांचा तालुक्‍यात गट आहे. जत तालुक्‍यातही असाच गट कार्यरत आहे. ही संख्या वाढतच राहील असे दिसते.

पाण्यामुळे आशादायक बदल होत असताना यंदा दुष्काळाचे सावट स्पष्ट आहे. टेंभूच्या पाण्यापासून वंचित मोठ्या क्षेत्रापुढे ही समस्या आहे. सध्या टंचाईचा फटका आठ हजार एकर क्षेत्राला आहे. टॅंकरवर भिस्त असून त्यामुळे खर्च वाढला आणि उत्पादन घटले. तेल्या आणि मर रोगाचे संकट आवासून कायम आहे. हे संकट टेंभूच्या लाभ क्षेत्रात अधिक आहे. कारण या भागातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातून डाळिंब बागा काढून टाकल्या जात आहेत. मर रोगावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे मोठी हतबलता आली आहे. ओला करपा रोगाने प्रथमच धुमाकूळ घालताना फळाचे वीस टक्‍के इतके नुकसान झाले आहे.

 

 

Web Title: Export of Sangli pomegranates to Europe this year