कोवीड स्पेशल गाड्यांना मुदत वाढ; कोल्हापूर- मुंबई कोयना गाडी पूर्ववत

शंकर भोसले
Sunday, 29 November 2020

कोरोना संसर्गानंतर राज्य शासनाकडून अनलॉकमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सुरू कोवीड स्पेशल रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे.

मिरज (जि. सांगली ) : कोरोना संसर्गानंतर राज्य शासनाकडून अनलॉकमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सुरू कोवीड स्पेशल रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे.

यामध्ये बंगळुरू-गांधीधाम ही गाडी 26 डिसेंबर पर्यंत तर गांधीधाम- बंगळुरू ही गाडी 29 डिसेंबर पर्यंत तर दोन साप्ताहिक एक्‍सप्रेस बंगळुरू गाडी 30 डिसेंबर पर्यंत तर जोधपूर एक्‍स्प्रेस 2 जानेवारीपर्यंत जोधपूर बंगळुरू एक्‍सप्रेस 31 डिसेंबर पर्यंत साप्ताहिक मैसूर अजमेर एक्‍सप्रेस 6 जानेवारी पर्यंत, तर अजमेर एक्‍सप्रेस तीन जानेवारी पर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

सध्या मिरज स्थानकातून कोवीड स्पेशल गाड्यांशिवाय इतर मार्गावरील गाड्या आद्यापही बंदच आहेत. यामुळे सोलापूर-कोल्हापूर, मिरज-परळी, मिरज-पंढऱपूर, कोल्हापूर-सातारा, मिरज-बेळगाव, मिरज-हुबळी यासह अनेक गाड्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असलातरी त्या अद्यापही सुरू होण्याची चिन्हे नाहीत.

मात्र प्रयोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या गाड्यांना रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ देऊन प्रवाशांना दिलासा दिला आहे. तसेच बंद असलेल्या आणि नोकरदार विद्यार्थी आणि कर्नाटकातील मजुरांना सोयीस्कर ठरणाऱ्या पॅसेंजर गाड्या तत्काळ सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून केली जात आहे. 

कोयना पूर्ववत सुरू राहणार 
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेस गाडी क्रमांक 01029 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून येथून दररोज 08.40 वाजता सुटेल आणि कोल्हापूरला त्याच दिवशी 20.00 वाजता पोहोचेल. तर कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर मुंबई गाडी क्रमांक 01030 विशेष गाडी कोल्हापूर येथून दररोज 08.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी 20.05 वाजता पोहोचेल.

या गाडीचे थांबे पुढील प्रमाणे ः दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, चिंचवड, खडकी, शिवाजीनगर, पुणे, जेजुरी, नीरा, लोणंद, वाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, शिरवडे, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension to Covid special trains; Kolhapur-Mumbai Koyna train remain as it is