'ओटीएस'ला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

तात्या लांडगे
शनिवार, 30 जून 2018

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची यादी बॅंकांना मिळालेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर एकरकमी परतफेड योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 

- एस.एस.संधू, मुख्य सचिव, सहकार विभाग 

सोलापूर : दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्यांना संबंधित बॅंकांमध्ये त्यांच्याकडील उर्वरित रक्‍कम भरण्याची मुदत 30 जून होती. त्यासाठी आता राज्य सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांची यादी व रक्‍कम बँकांना कधीपर्यंत मिळणार, याबाबत सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे अद्यापही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच राहणार आहेत. 

राज्य सरकारने 28 जून 2017 रोजी कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू केली. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील दु:खाचे ओझे बहुतांशी प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. कालांतराने कर्जमाफीसाठी भरलेल्या ऑनलाईन माहिती गोळा करुन त्याची पडताळणी करण्यातच 8-10 महिने गेले. मागील खरीप हंगामात जाहीर केलेली कर्जमाफी चालू खरीप हंगामातही मिळाली नाही. वर्षानंतरही कर्जमाफी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे नव्हे तर चिंतेचे ढग वाढत असल्याचे दिसून येते.

बॅंक खाते थकबाकीत गेल्याने शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंदच झाले. बहुतांशी शेतकऱ्यांना शेतीच्या विकासाकरिता तसेच सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाच्या मशागतीसह बियाणे व खतांसाठी बॅंकाकडून नव्याने अर्थसहाय मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी वाढत आहे. 

आकडे बोलतात... 
ओटीएसमधील शेतकरी 
7,38,317 
बॅंकांना मिळालेली माहिती 
3,06,589 
यादीच्या प्रतिक्षेतील शेतकरी 
4,31,728

Web Title: The extension of OTS to September 30