नेत्र शस्त्रक्रिया उद्यापासून पुन्हा सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

सातारा - शस्त्रक्रियागृहातील नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ही आल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयामधील नेत्र शस्त्रक्रिया मंगळवारपासून (ता. १०) पुन्हा सुरू होणार आहेत.

सातारा - शस्त्रक्रियागृहातील नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ही आल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयामधील नेत्र शस्त्रक्रिया मंगळवारपासून (ता. १०) पुन्हा सुरू होणार आहेत.

जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र नेत्र रुग्णालय आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू व काच बिंदूबरोबर डोळ्यांशी संबंधित अन्य आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय योजनेंतर्गत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होतात. त्यामध्ये चांगल्या दर्जाच्या लेन्सचा वापर केला जातो. तसेच चष्माही मोफत दिला जातो. या उलट खासगी रुग्णालयामध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक जिल्हा रुग्णालयात येतात. डोळा हा संवेदनशील अवयव आहे. त्यामुळे त्याच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे शस्त्रक्रियागृह निर्जंतूक असणे आवश्‍यक असते. त्यासाठी दर तीन महिन्यांनी शस्त्रक्रियागृहातील उपकरणे, शस्त्रक्रियेचा टेबल, हत्यारे तसेच भिंतीवरील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या जातात.

तीन आठवड्यांपूर्वी केलेल्या अशा तपासणीमध्ये नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवून पुन्हा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, अहवाल निगेटिव्ह आला नाही. त्यानंतरही दोन वेळा नमुने पाठविण्यात आले. त्यामध्येही भिंतीवरील नमुन्यात विषाणू आढळून आले.

त्यामुळे तीन आठवडे शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. त्यानंतर तज्ज्ञांकडून माहिती घेऊन निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर नमुने घेऊन पुण्याला पाठविण्यात आले होते. काल (ता. ७) त्याचा अहवाल मिळाला. त्यात शस्त्रक्रियागृहातील नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्‍वास टाकला. अन्य किरकोळ तयारी केल्यानंतर शस्त्रक्रियांना सुरू होतील.

शस्त्रक्रियागृहाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णांच्या डोळ्याला होऊ शकणारी संभाव्य इजा टाळण्यासाठी शस्त्रक्रिया बंद ठेवल्या होत्या. आताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नेत्र रुग्णालयातील सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा उपलब्ध होतील.
- डॉ. काटकर, नेत्ररोगतज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय

Web Title: eye surgery

टॅग्स