‘सिव्हिल’मध्ये नेत्रशस्त्रक्रिया बंद

प्रवीण जाधव 
शुक्रवार, 6 जुलै 2018

सातारा - शासकीय नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहामध्ये विषाणूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे मोतीबिंदू व काच बिंदूबरोबर अन्य शस्त्रक्रिया रखडल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे.

सातारा - शासकीय नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहामध्ये विषाणूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे मोतीबिंदू व काच बिंदूबरोबर अन्य शस्त्रक्रिया रखडल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत नेत्र रुग्णालय आहे. मोतीबिंदू निर्मूलन या राष्ट्रीय योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या शस्त्रक्रिया याठिकाणी होत असतात. त्याचबरोबर काचबिंदू व डोळ्याच्या अन्य विकारांवरही याठिकाणी शस्त्रक्रिया होतात. खासगी रुग्णालयांमध्ये अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठीही मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे सामान्य रुग्ण शस्त्रक्रिया करत नसत. त्यामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे राष्ट्रीय योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. तेथे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात. दररोज सुमारे दहा ते बारा जणांची शस्त्रक्रिया याठिकाणी होत असते.

मात्र, तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्ण नेत्र शस्त्रक्रियांपासून वंचित आहेत. जिल्हा रुग्णालयातील नेत्र रुग्णालयामध्ये स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह आहे. डोळा अत्यंत संवेदनशील अवयव आहे. त्यामुळे हे शस्त्रक्रिया गृह निर्जंतूक असणे आवश्‍यक असते. त्यामुळे शस्त्रक्रियागृहातील उपकरणे, मायक्रोस्कोप, टेबल, तसेच भिंती विषाणूमुक्त असणे आवश्‍यक आहे. अन्यथा डोळ्यांना इजा होण्याची शक्‍यता असते. त्यासाठी दर तीन महिन्यांनी उपकरणे व भिंतीवरील स्वॅप घेऊन तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जातात. त्याचे अहवाल योग्य आले तरच शस्त्रक्रियागृहात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी असते. मात्र, तीन आठवड्यांपूर्वी केलेल्या तपासणीमध्ये विषाणू आढळून आले. त्यामुळे याठिकाणच्या सर्वच शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत.

शस्त्रक्रियागृह सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू
शस्त्रक्रियागृहातील स्वॅपची तीन वेळा तपासणी करण्यात आली. नुकत्याच पाठविलेल्या सहा नमुन्यांमध्ये भिंतीवरील नमुन्यात विषाणू आढळले आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर उपाययोजना करून पुन्हा नमुने पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, तसेच विषाणूंचे निर्मूलन करण्यासंदर्भात मायक्रोबायोलॉजी विभागाकडूनही मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. श्रीकांत भोई यांनी सांगितले. शस्त्रक्रिया गृह लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Eye surgery closed in civil hospital

टॅग्स