एमबीए असल्याचे भासवणारा 'फेसबुक प्रियकर' निघाला जेसीबी चालक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

- एमबीए करत असल्याचे सांगितले होते त्याने

- पण प्रत्यक्षात निघाला चक्क जेसीबी चालक.

श्रीगोंदे : सोशल मीडियात त्याची व तिची ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्री आणि नंतर आपसूक प्रेमात झाले. त्या एमबीए करणाऱ्या मित्रासोबत लग्न करायचेच, असा विचार करून आईशी भांडण करून घराबाहेर पडली. थेट कर्नाटक हद्दीवरील गावातून श्रीगोंद्यात आली. येथील पोलिस ठाण्यात ठिय्या देत, प्रियकराला बोलावून लग्न करू देण्याचा हट्ट धरला. पोलिसांनी 'आभासी दुनिये'तील त्या प्रियकरास शोधून काढले. मात्र, तो निघाला 'जेसीबी'चालक. प्रेमातील असा भुलभुलैया समोर आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

श्रीगोंदे पोलिस ठाण्यात ही छोटीशी "लव्ह स्टोरी' घडली. कर्नाटकाच्या हद्दीवरील एका गावातील तरुणीचे श्रीगोंद्यातील एका तरुणासोबत सोशल मीडियातून सूत जुळले. प्रेमाच्या गप्पांमधून रंगविलेल्या स्वप्नात ती हरवून गेली. आई-वडील लग्नाला नकार देतील म्हणून तिने भांडण केले आणि निघाली त्याच्या शोधात.

पोलिसांकडूनच त्याचा ठावठिकाणा लागेल, असा तिचा कयास होता. त्यामुळे ती थेट श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गेली. उपनिरीक्षक विठ्ठल पाटील यांना तिने आपली प्रेमकहाणी सांगितली.

"तो एमबीए करतोय आणि मी विज्ञान शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकतेय. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्याला बोलावून आमचे लग्न लावा,' असा हट्ट धरला. त्यामुळे पाटील यांना धक्काच बसला.

पाटील यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने काही एक ऐकले नाही. मग नाइलाजाने पोलिसांनी तिच्या आभासी दुनियेतील राजकुमारास शोधून काढले. मात्र, तो निघाला थापाड्या. तो एमबीएचा विद्यार्थी नसून, दहावी नापास 'जेसीबी'चालक असल्याचे समजल्यावर तिचे प्रेम पार करपून गेले.

दरम्यानच्या चौकशीत तिची आई पोलिस कर्मचारी असल्याचे उपनिरीक्षक पाटील यांच्या लक्षात आले होते. त्यांनी तिच्या घरच्या लोकांशी संपर्क साधला आणि तुमच्या "लाडक्‍या' लेकीला घेऊन जा, असा संदेश धाडला. तो खाली मान घालून निघून गेला; तिला मात्र आईची वाट बघण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

सोशल मीडियाचे हे प्रकरण होते. ती पोलिसांकडे आल्याने पुढचा अनर्थ टळला. संबंधित मुलाने तिला थापा मारल्या. ती त्यात फसली. आम्ही चौकशी करून तिच्या घरच्या लोकांना बोलाविले. ते आल्यानंतर त्यांच्या हवाली करू.

- विठ्ठल पाटील, उपनिरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook lover fraud with Girl