फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रदानाचा जागर

परशुराम कोकणे
शनिवार, 23 जून 2018

फेसबुक दिंडीच्या पेजवर जाऊन नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार आहे. फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे आवाहन करणारा नेत्रवारी नावाचा लघुपटही बनवण्यात आला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.

सोलापूर : फेसबुक दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांची छायाचित्रे, व्हिडिओ तसेच लाईव्ह अपडेट्‌स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून तरुणांची धडपड आपण पाहिलीच आहे. यंदा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रवारीची संकल्पना मांडण्यात आली आहे. दिंडीच्या मार्गावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्रदानाचा जागर करण्यात येणार आहे. 

यंदा जगद्‌गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 333 वे वर्ष आणि आपल्या फेसबुक दिंडीचे हे 8 वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी टीमने यंदा औरंगाबादच्या व्यंकटेश परिवार या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा पाहीन मी याची देही याची डोळा.. असं म्हणत लाखो वारकरी पायी पंढरपूरपर्यंत चालत येतात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्षवारीत सामील होता येत नाही असे लाखो ई-वारकरी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद गेल्या सात वर्षांपासून मिळवत आहेत. 

आजही आपल्याच समाजातील एक घटक पंढरीच्या वारीचा हा सुख सोहळा पाहण्यापासून वंचित आहे आणि ते म्हणजे आपले अंध बांधव. त्यांना ही वारी कशी दाखवू शकतो. या सध्या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाल्याचे फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

पंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे. पण जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडी यावर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार.. 

फेसबुक दिंडीच्या पेजवर जाऊन नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार आहे. फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे आवाहन करणारा नेत्रवारी नावाचा लघुपटही बनवण्यात आला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.

फेसबुक दिंडीसोबतच नेत्रवारी यशस्वी करण्यासाठी स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, सुमीत चव्हाण, ओंकार महामुनी कार्यरत आहेत. 

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासच दर्शन घडवणारी एक महान परंपरा आहे. वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मांना, पंथांना सामावून घेतले आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडवणारी वारी याची देही याची डोळा अनुभवण्यासारखं सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही. सन 2016 साली फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या पाणी वाचवा या जलसंधारणाच्या मोहिमेला भरभरून मिळाला. गेल्यावर्षी वारी "ती'ची हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या नेत्रवारी मोहिमेला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल. 
 

- स्वप्नील मोरे, संस्थापक, फेसबुक दिंडी

Web Title: Facebook Rally Eye Donation