महापालिकेच्या प्रसूतिगृहांत मोफत सोनोग्राफी करण्याची सोय

विजयकुमार सोनवणे 
शुक्रवार, 25 मे 2018

सोलापूर - महापालिकेने प्रसूतिगृहांत सोनोग्राफी करण्याची मोफत सोय केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत तीन प्रसूतिगृहांत मिळून एक हजार 856 जणींची तपासणी झाली. त्यामुळे आतापर्यंत रुग्णांच्या तब्बल १४ लाख ८४ हजार ८००  रपयांची बचत झाली आहे. खासगी रुग्णालयात ८०० रुपये शुल्क आहे. 

सोलापूर - महापालिकेने प्रसूतिगृहांत सोनोग्राफी करण्याची मोफत सोय केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत तीन प्रसूतिगृहांत मिळून एक हजार 856 जणींची तपासणी झाली. त्यामुळे आतापर्यंत रुग्णांच्या तब्बल १४ लाख ८४ हजार ८००  रपयांची बचत झाली आहे. खासगी रुग्णालयात ८०० रुपये शुल्क आहे. 

महापालिकेचे दवाखाने सुधारण्याचा संकल्प आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केला आहे. त्यानुसार दवाखाने व प्रसूतिगृहे सुधारण्यासाठी आवश्‍यक सुविधा केल्या आहेत. त्याअंतर्गत दाराशा, डफरीन आणि बॉईस या प्रसूतिगृहांमध्ये सोनोग्राफी यंत्रे बसविण्यात आली आहेत. ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने रुग्णांची मोठी गर्दी या तीन केंद्रांवर होत आहे. दाराशा आणि डफरीन हॉस्पिटलमध्ये महापालिकेने, तर बॉईस प्रसूतिगृहात डॉ. सतीश वळसंगकर यांनी दिलेले सोनोग्राफी यंत्र बसविण्यात आले आहे. 

सुरवातीला महापालिकेच्या प्रसूतिगृहांत तपासणी करण्यासाठी जायचे म्हटल्यावरही रुग्णासह नेणाऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असे. सुविधा नसल्यामुळे नागरिक प्रत्येक तपासणी व औषधोपचारासाठी खासगी दवाखान्यांची पायरी चढत. त्याच वेळी त्यांच्या खिशालाही कात्री लागत असे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही प्रसूतिगृहे सुधारली आहेत. त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढली आहे.

सोनोग्राफीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. गरज असेल तरच सोनोग्राफीची सूचना केली जाते. दाराशा हॉस्पिटलमध्ये डॉ. शोभा शहा, डफरीन हॉस्पिटलमध्ये डॉ. मीनल चिडगुपकर आणि बॉईस मॅटर्निटीमध्ये लता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रुग्णांना मिळणारा प्रतिसाद पाहता गरीब रुग्णांची पावले आपोआप महापालिकेच्या रुग्णालयांकडे वळत आहेत. प्रसूतिपश्‍चात सुविधा देण्यासाठीही महापालिकेने विविध योजनेंतर्गत सुविधा केली आहे. त्याचाही फायदा रुग्णांना मिळू लागला आहे. 

आकडे बोलतात.... 
प्रसूतिगृह तपासणी 
डफरीन 1515 
दाराशा 309 
बॉईस 32 
----------------------------------
एकूण 1856 

ही सुविधा प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी आहे. तातडीची गरज भासल्यावरच ग्रामीण रुग्णांची दखल घेतली जाते. शहरातील या तिन्ही ठिकाणी तपासणीसाठी तज्ज्ञ महिला डॉक्‍टरांची नियुक्ती आहे. त्यामुळे रुग्णांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. 
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी

Web Title: Facility to free sonography in municipality's hostel