उत्पादनावर प्रक्रिया करणारे कारखाने लवकरच - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - २०१८-१९ च्या खरीप हंगामाबाबत झालेल्या कृषीच्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील.
कोल्हापूर - २०१८-१९ च्या खरीप हंगामाबाबत झालेल्या कृषीच्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

कोल्हापूर - ‘जिल्ह्यात खरीप हंगामात पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारी सर्व प्रकारची बी-बियाणे, खते, कीटकनाशके मुबलक आणि दर्जेदारच उपलब्ध करून द्यावीत तसेच उत्पादनावर प्रक्रिया करणारे कारखाने सुरू करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. कृषी साहित्य देण्यास हयगय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात २०१८-१९ साठी ४ लाख ५ हजार हेक्‍टर असे क्षेत्र निश्‍चित केले. शेतकऱ्यांना खरिपासाठी लागणारी बि-बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांना वेळेत द्यावीत, यात हयगय करता कामा नये. शेतकऱ्यांना दिले जाणारे साहित्य दर्जेदार असावे. गुणवत्ता नियंत्रण कडक करावी. सर्व बियाणे किंवा इतर साहित्य गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे तपासणीचे निर्देशही त्यांनी दिले. गावोगावी भरारी पथकांतर्फे तपासणीचे आदेशही त्यांनी दिले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण, पीक पद्धती, पाणी, खतांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवारची कामे दर्जेदार करावीत, या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे अधिकाऱ्यांनी स्वत:च्या घर उभारणीसारखी करावीत’’. ही आशा व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवारच्या कामातून शाश्‍वत विकास होत असल्याने शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला प्राधान्य दिले. आगामी दोन वर्षांत जिल्ह्यातील सर्व गावे जलयुक्त शिवार अभियानातून जलसमृद्ध करण्याचा संकल्प आहे.

यासाठी शासन योजनांबरोबरच लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेऊन गावागावात समृद्ध जलसाठे निर्माण करण्यात येतील. यंदा या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८० गावांची निवड केली असून प्रत्येक गावासाठी ३० लाखांच्या निधीचे आराखडे शासनाने मंजूर केले.’’ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची प्रक्रिया पावसाळ्यात पूर्ण करून पावसाळा संपताच ही कामे प्रत्यक्षपणे सुरू करण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, अग्रणी बॅंक अधिकारी राहुल माने, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम उपस्थित होते.

६ लाख मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप
जिल्ह्यात माती परीक्षणाद्वारे पीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. जिल्ह्यात दोन वर्षांत ९० हजार २५४ माती नमुने काढले. ६ लाख १५ हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप केले. भविष्यात या कामाला प्राधान्य दिले जाईल. हुमणी नियंत्रण प्रकल्प अधिक गतिमान करून त्याची गावोगावी प्रात्यक्षिके करण्याची सूचना त्यांनी केली. सेंद्रिय शेतीला चालना देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

कार्यशाळा नव्हे, मुद्द्याचे बोला 
जिल्ह्यातील १३ कोटी कृषी विभागाचा निधी शासनाला परत गेला. यातच आजच्या बैठकीत अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी जिल्ह्यातील शेतीबद्दल केलेल्या कामाचा आणि भविष्यातील नियोजन कागदावर लिहून आणले. पालकमंत्र्यांसमोर त्याचे वाचन सुरू केले. यावेळी पालकमंत्र्यांनी मास्तोळी यांच्यावर तोफ डागत ही कार्यशाळा नाही. जिल्ह्यात काय आहे हे मला माहिती आहे, मुद्द्याचे बोला.

मागेल त्याला ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर
राज्यात १० लाख शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेतीचं प्रशिक्षण देण्यासाठी एजन्सीच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकी अभियान गतिमान केले आहे. गेल्या वर्षी या अभियानातून १२ कोटी ५० लाखांचा खर्च करून शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, रोटावेटर वितरित केले. जिल्ह्यात मागेल त्याला ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर दिला जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

३६१ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 
जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून सुमारे २ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ३६१ कोटी रुपयांची कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वर्ग केली. उरलेल्या कर्जमाफीच्या याद्यातील त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. पीक  कर्जासाठी आणि शेती विकासासाठी आवश्‍यक असणारा निधी बॅंकांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा. बॅंकांनी शेतकऱ्यांसाठी नियम आणि व्यवहाराची सांगड घालून अधिकाधिक अर्थसहाय्य करावे, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. 

मागेल त्याला वीज जोडणी 
जिल्ह्यात मागेल त्याला वीज जोडणी ही भूमिका शासनाने घेतली आहे. जिल्ह्यातील शेती पंपांना वीज जोडणी देण्याची विशेष मोहीम राबविली जाईल. जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या ८ हजार ४९४ शेती पंपांना वीज कनेक्‍शन देण्यासाठी ८७ कोटींची गरज आहे. हा निधी प्राधान्याने देणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com