पोलिस उपनिरीक्षक असल्याचे खोटे सांगून हॉटेलवर मुक्काम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सोलापूर : पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून सात रस्ता येथील हॉटेल सेंटर पॉइंटच्या व्यवस्थापकाची 48 हजार 319 रुपयांची फसवणूक केली आहे. 12 दिवस हॉटेलवर मुक्काम करून बिल न देता निघून गेल्याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर : पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून सात रस्ता येथील हॉटेल सेंटर पॉइंटच्या व्यवस्थापकाची 48 हजार 319 रुपयांची फसवणूक केली आहे. 12 दिवस हॉटेलवर मुक्काम करून बिल न देता निघून गेल्याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

योगेश आर. काळे व आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे व्यवस्थापक संजय नारायण चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. सात रस्ता येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे 6 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास योगेश काळे व त्याचे सहकारी आले. काळे याने पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून आपल्याकडील ओळखपत्र दाखविले. त्याच्यासोबत दोन पुरुष आणि एक महिला होती.

माजी पोलिस आयुक्त साहेबांसोबत मीटिंग आहे व 150 मुलांना एसआरपीएफ कॅम्प येथे ट्रेनिंग घेण्याकरिता आलो आहे असे सांगितले. हॉटेल व्यवस्थापक चव्हाण यांना त्याची खात्री पटल्याने ओळखपत्राची झेरॉक्‍स घेऊन राहण्यासाठी रूम दिली. ते सर्वजण 17 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत रूमवर राहिले. रूम सोडून जाण्याच्या दिवशी मी आता पोलिस आयुक्त साहेबांकडे चाललो आहे. तुमच्या एकूण बिलाची रक्कम किती आहे ते सांगा, मी तुम्हाला लगेच पाठवून देतो असे म्हणून ते सर्वजण निघून गेले. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकांनी काळे यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन केला. मी तुळजापूर येथे बंदोबस्तासाठी आहे, मी रात्री बिल भरण्यासाठी येतो असे सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर अनेकदा फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

व्यवस्थापक चव्हाण यांना संशय आल्यानंतर एसआरपीएफ कॅम्प आणि पोलिस आयुक्तालय या ठिकाणी जाऊन योगेश काळे नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. दोन्ही ठिकाणी त्या नावाचा कोणताही व्यक्ती पोलिस उपनिरीक्षक पदावर नसल्याचे समजले. त्यानंतर चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेऊन 48 हजार 319 रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक कैलास कांबळे तपास करीत आहेत.

Web Title: fake police rest in hotel at solapur