फलटण- लोणंद मार्गावर धावली रेल्वे!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

सहा प्रवासी डब्यांसह वेग व मार्गाची झाली यशस्वी चाचणी
फलटण शहर - फलटणकर जनतेचे रेल्वेचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने आज मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत लोणंद ते फलटण मार्गावर रेल्वेच्या सहा प्रवासी डब्यांसह वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेतली. या वेळी फलटणवासीयांनी विविध स्टेशनवर गर्दी करून रेल्वेचे स्वागत केले.

सहा प्रवासी डब्यांसह वेग व मार्गाची झाली यशस्वी चाचणी
फलटण शहर - फलटणकर जनतेचे रेल्वेचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने आज मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत लोणंद ते फलटण मार्गावर रेल्वेच्या सहा प्रवासी डब्यांसह वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेतली. या वेळी फलटणवासीयांनी विविध स्टेशनवर गर्दी करून रेल्वेचे स्वागत केले.

प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव नाईक- निंबाळकर यांनी फलटणमधून रेल्वे सुरू होण्यासाठी मोठा संघर्ष केला. लोकसभेत वारंवार आवाज उठवून रेल्वेमार्गाला मंजुरी मिळविली. त्यानंतरही काम पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच होता. त्याची परिणीती लोणंद ते फलटण रेल्वेमार्ग पूर्ण होऊन रेल्वे विभागाकडून या मार्गावर वारंवार रेल्वे इंजिनच्या चाचण्या घेतल्या गेल्या. आज रेल्वेची प्रवासी डब्यांसह शेवटची चाचणी घेण्यासाठी खास मुंबईहून रेल्वेगाडी आली. लोणंद ते फलटण रेल्वेमार्गावर धावलेल्या या रेल्वेगाडीत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मार्गावर वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली. रेल्वे पाहण्यासाठी लोणंद ते फलटण मार्गावर जनतेने गर्दी केली होती. कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते रेल्वेचे पूजन करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे गाडीचे वेगवेगळ्या वेगांवर चाचणी करण्याआगोदर छोट्या इंजिनाद्वारे मार्गाची पाहणी केली. आज झालेल्या चाचणीचा अहवाल दिल्ली येथील रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार असून, त्यानंतर महिन्याभरात या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. या चाचणीसाठी सुशीलचंद्र, एम. के. गुप्ता, सुनील म्हस्के, सुनीलकुमार, आर. एन. गुप्ता आदी वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलिस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

येत्या महिन्याभरात फलटण- लोणंद मार्गावरून प्रत्यक्ष रेल्वे प्रवास नियमित सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. लवकरच फलटण ते बारामती व फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाचेही कामे सुरू होईल.
- रणजितसिंह नाईक- निंबाळकर, युवा नेते

Web Title: faltan-lonand railway route