फलटण: नलवडे कुटुंबियांचा ठेवला अवयवदानाचा आदर्श

संदीप कदम
शनिवार, 17 जून 2017

फलटणमधील देवेंद्र जगन्नाथ नलवडे (वय 45) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी विविध अवयवदानाचा निर्णय घेऊन अनेकांना आधार दिलाच पण इतरांपुढेही आदर्श ठेवला.

फलटण (सातारा) - फलटणमधील देवेंद्र जगन्नाथ नलवडे (वय 45) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी विविध अवयवदानाचा निर्णय घेऊन अनेकांना आधार दिलाच पण इतरांपुढेही आदर्श ठेवला.

अवयवदान हे श्रेष्ठदान असे मानले जाते. वैद्यकीय शास्त्रानुसार ज्या व्यक्तीची हृदयक्रिया बंद पडली आहे. ते व्यक्ती नेत्र व त्वचादान करू शकतात. मात्र ब्रेनडेड अवस्थेतील रुग्ण हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे देखील दान करू शकतो. परंतु हे दान करण्यासाठी रुग्णाच्या कुटुंबियांच्या मनाचे मोठेपणा आणि औदार्यही आवश्‍यक असते. असे औदार्य फलटणच्या नलवडे कुटुंबियांनी दाखवले आहे. फलटण शहरातील देवेंद्र जगन्नाथ नलवडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना पुणे येथे गेल्या आठ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्‍टरांनी ब्रेनडेड झाल्याचे सांगितले व काही कालावधीतच त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे शरीरातील सहा अवयवांचे दान पुण्यामध्येच करण्यात आले. फलटणमधील नलवडे कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे फलटणकरांसमोर आदर्श निर्माण झाला आहे.

देवेंद्र नलवडे यांचे बंधू महेंद्र नलवडे हे फलटण न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात तर सुरेंद्र नलवडे हे दुसरे बंधू मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई , दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: faltan news maharashtra news nalwade family Organ donation