धाकधूक असल्याने नेत्यांच्या संपर्कात इच्छुक

धाकधूक असल्याने नेत्यांच्या संपर्कात इच्छुक

फलटण - तालुक्‍यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सरपंच, सदस्यपदांसाठी इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळे नेमकी उमेदवारी कोणास द्यावी याबाबतची कसरत तालुका पातळीवरील नेत्यांच्या बरोबरीने गावपातळीवरील गटनिहाय नेत्यांना करावी लागताना दिसत आहे. इच्छुकांचीही धाकधूक वाढली असून, उमेदवारीसाठी ते सतत नेत्यांच्या संपर्कात दिसत आहेत. 

तालुक्‍यात आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्येच चुरस होती; पण होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आपापल्यापरीने उमेदवार उतरविणार असल्याचे निश्‍चित आहे. मात्र, अशी कोणत्याही गावामध्ये भाजप व शिवसेनेची पुरेशी ताकद नसल्याने काही उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी उमेदवार निश्‍चित झाल्याचे दिसून येते. तालुक्‍यातील सुरवडी, तरडफ, झडकबाईचीवाडी आणि आदर्की खुर्द या चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले असल्याने इच्छुकांची वाढीव संख्या कशी थोपवावी याबाबत गाव पातळीवर आडाखे मांडण्याचे काम सुरू आहे. बरड, मानेवाडी, पाडेगाव, सोमंथळी, वडले, विडणी, या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने तेथेही एकाच पक्षातील विविध गटांमध्ये उमेदवारी देण्याबाबत चुरस असल्याचे चित्र आहे. काही झाले तरी गाव आपल्या ताब्यात कसे राहील, अशा प्रकारचे आडाखे बांधून झाले असून, निवडून येणारा उमेदवार देण्याबरोबरच जो निवडून येईल तो आपलाच या भावनेने उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजेगटाच्या ग्रामपंचायती अधिक प्रमाणात आहेत. त्यातच निवडणुका लागलेल्याही २४ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आपल्या गटाची सत्ता आबाधित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या संपर्कात संबंधित गावातील गावपातळीवरील नेते असून, उमेदवारांची यादी तपासून व तावून सुलाखून निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. तालुक्‍यामध्ये काँग्रेसही मागील निवडणुकीत काही प्रमाणामध्ये ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवून आपली राजकीय ताकद आजमावली असल्यामुळे याहीवेळी पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरण्याची तयारी झाल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे प्रल्हादराव साळुंखे (पाटील) व रणजितसिंह नाईक- निंबाळकर आपापल्यापरीने परिसरातील ग्रामपंचायतीच्या बरोबरीने अन्य गावांशीही संपर्कात असल्याचे दिसून येते किंबहुना त्यांच्या गटाचे इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

गावागावांत खबरे सक्रिय!
ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी आता उरलेल्या शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार असे जाणवत आहे. रिंगणात आपल्याविरुद्ध नेमका उमेदवार कोण असेल याची चाचपणी आपापल्या खबऱ्यांमार्फत घेण्याचे कामकाज सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com