भंडादऱ्यातून जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध 

water
water

नगर : जिह्यातील जनतेच्या विरोधाला न जुमानता भंडारदरा, निळवंडे धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (सोमवारी) भंडारदरा धरणातून पाणी सोडणार असल्याची माहिती मिळताच अकोले येथे सर्व पक्षीया नेत्यांसह शेतकरयांनी प्रवरा नदीपात्रात आज रात्रीच ठिय्या मांडला आहे. किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले, खासदार सदाशीव लोखंडे, आमदार वैभव पिचड यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. 

भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात दहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडे धरणात 8.1 टीएमसी पाणीसाठा झाला असून, निळवंडे धरण 99 टक्के भरले आहे.  त्यामुळे भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला असून, तो दुपारी चार हजार क्युसेक्सने सुरू होता. निळंवडे धरण भरल्यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असून, त्यासाठी जलसंपदा विभागाने जोरदार तयारी केली आहे.

त्यामुळे आजच रात्री खासदार सदाशिव लोखंडे, कॉ. अजित नवले यांच्यासह शेतकर्‍यांनी प्रवरा नदी पात्रात अकोले येथे अगस्ती पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी प्रवरेचे पाणी पुला खालून फक्त दोन फुटावरून वाहत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या पथकासह घटनास्थळी आहेत. तसेच तहसिलदार मुकेश कांबळे हे देखील उपस्थित आहेत. 

नगर जिह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातूनही मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या भागातील जनतेने पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. बंद, रास्ता रोको, मंत्र्यांना निवेदने, ताफा अडवणे, चाकबंद अशी विविध आंदोलने केली आहेत, तर काही आंदोलनांचा इशारा दिला आहे.

नगर जिह्यातील अकोले तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसल्याने येथील जनता व नेते जास्तच आक्रमक झाले आहेत. मात्र, हा विरोध डावलून सोमवारी कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाची संपूर्ण तयारी झाली आहे. फक्त पोलीस बंदोबस्त व यंत्रणा मिळण्याची वाट हा विभाग पाहत असून, पोलीस बंदोबस्त मदत मिळताच पाणी सोडण्यात येणार आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणांतून 3.85 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला सहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, नंतर दोन-दोन हजारने वाढवत अंतिम दहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणातूनही याचवेळी पाणी सोडण्यात येणार असून, सुमारे 1.90 टीएमसी पाणी या धरणातून सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, नंतर ते सहा हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
मुळा धरणातून सोडलेले पाणी नेवासा तालुक्यातील पाचेगावजवळ प्रवरा नदीला मिळते. नंतर या दोन्ही नद्या प्रवरासंगमजवळ गोदावरी नदीला मिळतात. त्यानंतर हे पाणी जायकवाडी धरणाकडे जाते. प्रवरा नदीला पाणीपातळी वाढणार असल्याने नागरिकांनी पाण्याकडे जाऊ नये, मोटारी काढून घ्याव्यात, दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. आज रात्री अकोल्यात सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनात  आमदार वैभव पिचड, शेतकरी नेते  डाॕ. अजित नवले, महेशराव नवले, सुरेश नवले,  रोहीदास धुमाळ ,सोमनाथ नवले , मा.मिनानाथ पांडे, जिल्हा परिषद सभापती कैलास वाकचौरे, खंडु वाकचौरे, कॉ. शांताराम वाळुंज, यशवंतराव आभाळे, प्रदीप हासे, शंभु नेहे, डॉ संदीप कडलक, डॉ.मनोज मोरे, स्वप्निल नवले सहभागी झाले होते. 

''आमचे हे आंदोलन अकोले तालुका दुष्काळी जाहिर करण्यासाठी आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या पद्धतीने पाणी सोडण्यास विरोध नाही, पण अकोले तालुका दुष्काळी व कोरडा ठेवून तूम्ही पाणी सोडूच शकत नाही. आधी दुष्काळ जाहिर करा, मग पाणी सोडा. तोपर्यंत पाणी सोडू देणार नाही. आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.''
- अजित नवले, शेतकरी नेते, अकोले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com