राज्यातील शेतकरी संकटात

तात्या लांडगे
मंगळवार, 19 जून 2018

कर्जमाफी, तूर, हरभऱ्याचे 22 हजार कोटी रखडले

कर्जमाफी, तूर, हरभऱ्याचे 22 हजार कोटी रखडले
सोलापूर - हमीभावाने विकलेली तूर - हरभऱ्यांची रक्कम, उसाचा "एफआरपी', कर्जमाफीची रक्कम आणि हमीभावाने विक्री न झालेल्या तूर व हरभऱ्याच्या अनुदानाची रक्‍कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मार्केटिंग फेडरेशन, सहकार विभाग आणि साखर आयुक्‍त कार्यालयाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 22 हजार 520 कोटी 45 लाख रुपये मिळालेले नाहीत.

नैसर्गिक संकटांवर मात करत वर्षभर शेतात अहोरात्र कष्ट करून पिकांची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यांसह सरकारकडूनही रक्‍कम मिळत नाही. मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून, त्यांच्यासमोर खासगी सावकाराशिवाय पर्याय उरला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या रकमेसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मंत्रालय स्तरावर वारंवार बैठका होऊनही ठोस तोडगा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडते आहे.

हमीभावाने खरेदी न झालेल्या तूर व हरभऱ्याला प्रतिक्‍विंटल एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे; परंतु अनुदानासाठी पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आणखी दहा दिवस लागतील. कर्जमाफीची रक्‍कमही शेतकऱ्यांना लवकरच मिळेल.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

आकडे बोलतात...
एफआरपीची थकबाकी - 1963.57 कोटी
तुरीची न मिळालेली रक्‍कम - 403.22 कोटी
हरभऱ्याची न मिळालेली रक्‍कम - 637.88 कोटी
कर्जमाफीची अपेक्षित रक्‍कम - 19,257 कोटी
तूर व हरभरा अनुदान - 258.78 कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer disaster in state