खरीपाच्या कर्जासाठी शेतकरी हैराण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

शेतकऱ्यांना सध्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज आवश्‍यक आहे. त्यात बँकानी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज वितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या बँकाविरुद्ध कडक कार्यवाही केली जाईल. तसेच, त्यांच्याकडील सरकारी ठेवीही काढण्यात येतील, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज घोषित केली.

नगर: शेतकऱ्यांना सध्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज आवश्‍यक आहे. त्यात बँकानी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज वितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या बँकाविरुद्ध कडक कार्यवाही केली जाईल. तसेच, त्यांच्याकडील सरकारी ठेवीही काढण्यात येतील, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज घोषित केली.

नियोजन भवनातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी आज बँकाच्या खरीप कर्ज वितरणाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी बँकाच्या उपस्थित प्रतिनिधीना तंबीच दिली. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गवळी यांच्यासह बँकाचे जिल्हा व्यवस्थापक व त्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी बँकनिहाय कर्जवितरणाचा तपशीलवार आढावा घेतला. 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत आणि त्यानंतर आजपर्यंत किती शेतकऱ्यांना बँकानी कर्ज वितरित केले, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. अपवाद वगळता बहुतांश बँकानी अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज वितरणाबाबत वेगाने कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी त्याबाबत तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. बँकानी त्यांच्या शाखानिहाय सेमिनार आयोजित करुन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

कर्ज वितरणात एका आठवड्यात सुधारणा करा. कर्जवितरणाची बाब गंभीरपणे घ्या, असेही ते म्हणाले. जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन शेतकऱ्यांच्या कर्ज मागणी अर्जांबाबत तपासणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले. तसेच बैठकीस गैरहजार असलेल्या बँकाना "कारणे-दाखवा' नोटीस बजावण्याचे निर्देशही दिले आहेत.

Web Title: Farmer facing problem to get loan