बळिराजाला संपूर्ण कर्जमाफीची आशा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सोलापूर - राज्यात आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा, आश्‍वासने विविध राजकीय पक्षांकडून दिली जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे. त्यामुळे मागील पाच-सहा महिन्यांत सुमारे ९० टक्‍के थकबाकीदारांनी त्यांच्याकडील दीड लाखांवरील रक्‍कम बॅंकांमध्ये भरली नसल्याचे बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जून २०१७ मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना १८ महिन्यांनंतरही लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्यांसाठी लागू केलेल्या एकरकमी परतफेड योजनेला (ओटीएस) आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिली. आता त्याची मुदत डिसेंबरअखेरीस संपुष्टात येत आहे. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. राज्यातील दुष्काळ, बॅंक खाती थकबाकीत, शेतमालाचे गडगडलेले दर, वाढीव दुधाची प्रतीक्षा आणि उसाच्या एफआरपीचा तिढा यासह अन्य कारणांमुळे राज्यातील शेतकरी पिचला आहे.

कर्जमाफीसाठी विलंब लागत असल्याने आणि निवडणुका तोंडावर येत असल्याने थकबाकीदारांची मानसिकता बदलत आहे. आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण कर्जमाफी होईल, या आशेपोटी दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या एकाही कर्जदाराने मागील तीन महिन्यांत रक्‍कम बॅंकेत जमा केली नाही. त्यामुळे बॅंकेला व्यवहारासाठी अडचणी येत आहेत.
- के. आर. पाटील, व्यवस्थापक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक

निकष बदलले, पण लाभाची प्रतीक्षाच
राज्य सरकारने राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी दीड लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार राज्यातील ५८ लाख ४३ हजार जणांनी अर्ज केले. आता सरकारने प्रत्येक कर्जदाराला दीड लाखाची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे दीड लाखाहून अधिक कर्ज असलेल्यांची संख्या १२ लाखांपर्यंत जाणार आहे. परंतु, नव्या निर्णयानुसार कर्जदारांची आकडेवारी व रक्‍कम अद्यापही अंतिम झाली नसल्याचे सहकार आयुक्‍त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: farmer hope for full debt waiver