आजरा तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

आजरा - हात्तिवडे (ता.आजरा) येथील बळवंत शंकर कुंभार (वय ४५) यांच्यावर होनेवाडी (ता. आजरा) गावच्या तिट्ट्याजवळील माळशेत नावाच्या शेतामध्ये गव्याने हल्ला केला आहे. त्यात कुंभार हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

हात्तिवडे येथील बळवंत कुंभार आणि श्रावण कांबळे हे दोघेजण होनेवाडी तिट्ट्याजवळील माळशेत  येथे काजूंच्या झाडांची राखण करण्याकरिता गेले होते. याचदरम्यान झुडपात लपून बसलेल्या गव्याने पाठीमागून कुंभार यांच्यावर हल्ला केला. गव्याला पाहताच श्रावण कांबळे यांनी प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला.

सोबत असणार्‍या कुत्र्याने जोरदार भुंकण्यास सुरुवात केल्याने गवा जंगलाच्या दिशेने निघून गेला. या हल्ल्यात कुंभार यांच्या डाव्या कुशीसह खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्‍यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्‍णलयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच वनक्षेत्रपाल डॉ. सुनील लाड, वनपाल अशोक राऊत, वनरक्षक कृष्णा डेळेकर यांनी आजरा ग्रामीण रुग्णालयात तातडीने भेट देवून जखमींची विचारपूस केली. महिनाभरात आजरा तालुक्यातील तिघांवर गव्याने हल्ला केला असून यातील दोघांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकाराने शेतकरी वर्गात चिंतेंचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Farmer injured in Gava attack in Ajra Taluka