कोल्हापूर : हात्तीवडे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

कोल्हापूर : हात्तीवडे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

आजरा - हात्तीवडे (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दिनकर आण्णाप्पा पाटील (वय 65) हे शेतकरी जखमी झाले. बामणीकी नावाच्या शेतात ते आज सकाळी जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. गवत कापत असतांना गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमाराला ही घटना घडली. यामुळे हात्तीवडे पंचक्रोशीत भितीचे वातावरण पसरले आहे.

आजरा तालुक्‍यात गव्याच्या हल्ल्याची गेल्या चार महिन्यात ही चौथी घटना आहे. यामध्ये दोघे जण जखमी झाले. तर दोघांचे बळी गेले आहेत. हात्तीवडेतील ही दुसरी घटना असून दोन महिन्यापुर्वी गव्याच्या हल्ल्यात बळवंत शंकर कुंभार हे जखमी झाले होते. 

दिनकर पाटील नेहमीप्रमाणे जनावरांना वैरण आणण्यासाठी चांदेवाडी-हात्तीवडे हिरण्यकेशी बंधाऱ्या नजीक असलेल्या बामणकी नावाच्या शेतात गेले होते. तेथे ते बांधावर चारा कापत होते. या वेळी झुडपात बसलेला गवा त्यांना दिसला नाही. त्याची चाहुल लागल्यावर श्री. पाटील यांनी बाजूला पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण दरम्यान गव्याने उचलून त्यांना सिताराम पाटील यांच्या शेतात फेकले. त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गव्याची शिंगे घुसली आहेत.

चित्रा नदीत जनावरे धुत असलेल्या राजेंद्र चाळु पाटील यांना हल्ला झाल्याचे लक्षात आले. ते तातडीने मदतीला धावले. त्यांनी कुत्रे गव्याच्या दिशेन सोडल्याने गवा नदीच्या काठावरून जंगलाच्या दिशेन निघून गेला. श्री. पाटील यांनी दिनकर यांना उचलून रस्त्यावर आणले. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयाकडे हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लजच्या खासगी रुग्णालयाकडे दाखल केले आहे.

यापुर्वी गव्याच्या हल्ल्यात बळवंत कुंभार हे शेतकरी जखमी झाले होते. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी एस. के. लाड यांनी जखमीची विचारपुस केली. वनपाल अशोक राऊत, वनरक्षक कृष्णा डेळेकर, प्रतिभा पाटील घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

सहा महीन्यात गव्याच्या हल्यात दोन बळी
यापूर्वी सोहाळे येथील हौशाबाई परसु पेडणेकर व इटे येथील शेतकरी रामचंद्र गोविंद कांबळे हे गव्याच्या हल्यात ठार झाले आहेत. सहा महीन्यात दोन बळी गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com