गुंठे पाटील यादीत... खरा शेतकरी वंचित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असल्याने खरा शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. तर घर बांधण्यासाठी ज्यांनी एक, पाच ते दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे, त्यांचीही नावे या यादीत आली आहेत. त्यामुळे कर्जमाफीप्रमाणे शेतकरी सन्मान निधीतही खरा शेतकरी वंचित राहण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

सातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असल्याने खरा शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. तर घर बांधण्यासाठी ज्यांनी एक, पाच ते दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे, त्यांचीही नावे या यादीत आली आहेत. त्यामुळे कर्जमाफीप्रमाणे शेतकरी सन्मान निधीतही खरा शेतकरी वंचित राहण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या पाच मार्चपासून लागण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०० रुपये का होईना टाकता यावेत, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून याचा निवडणुकीत थोडा का होईना फायदा होईल. प्रत्यक्षात या योजनेचे निकष किमान ठेवण्यात आले आहेत. यामध्ये स्पष्टता नसल्याने अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. सात-बारा व खाते उताऱ्यावर नावे असूनही अनेक शेतकऱ्यांची नावे यातून वगळली गेली आहेत. तर ज्यांनी घर बांधण्यासाठी एक, पाच ते दहा गुंठ्यांपर्यंत जमिनी खरेदी केल्या आहेत, अशा जमिनी अद्याप बिगरशेती झालेल्या नाहीत. त्यांची नावे या यादीत आलेली आहेत. या सर्वांना सन्मान निधी मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

त्यामुळे खरे शेतकरी वाऱ्यावर आणि गुंठे पाटील झाले पात्र, अशी परिस्थिती झाली आहे. कमीत कमी किती क्षेत्र असणारा शेतकरी असावा, हे यामध्ये स्पष्ट केले नाही. त्यामुळे १८ गुंठेच्यावर शेती असलेल्यांचा यामध्ये समावेश व्हायला हवा. १८ वर्षांवरील सर्व शेतकरी ज्यांचे सात- बारावर नाव आहे, अशांचा ही या योजनेत समावेश होणे गरजेचे आहे. मुळात डिजिटलायजेशनमध्ये त्रुटी राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या नावांचा यादीत समावेश झालेला नाही. या सर्व त्रुटी दूर करून मगच महसूल विभागाने शेतकऱ्यांची यादी अंतिम करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.  

सहहिस्सेदार वंचित....
एकाच कुटुंबातील सर्वांची नावे सातबारावर आहेत. पण, त्यांची खातेफोड झालेली नसल्याने यातील कुटुंबप्रमुखालाच सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित खातेदार काही वर्षांपासून स्वतंत्र राहात असूनही त्यांना सहहिस्सेदार असल्याने लाभ मिळणार नाही. परिणामी यावरून गावागावांत वाद होऊ लागले असून, तलाठी, ग्रामसेवक व सोसायटी सचिव यांना या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.

सध्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत नाहीत, त्यांचेही अर्ज भरून घेतले जाणार आहेत. नावांची तपासणी करून यादीत नसलेल्या शेतकऱ्यांची नावे सन्मान यादीत समाविष्ट केली जातील. त्यामुळे कोणीही शेतकरी या सन्मान योजनेपासून वंचित राहणार नाही.
- नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार, सातारा

...अशी होणार कार्यवाही
त्या त्या तहसीलदारांकडे या योजनेतील अनुदानाचे वाटप आहे, त्यासाठी महसूल, कृषी, जिल्हा परिषद आणि सोसायट्यांचे सचिव यांच्याकडे काम दिले आहे. याद्यांचे गावनिहाय वाटप करण्यात आले आहे. तहसीलदारांकडे याद्या तयार असून, शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि बॅंक खाते नंबर भरल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. 

Web Title: Farmer Loanwaiver Government Subsidy