शेतकऱ्याने पाठविला राज्यपालांना धनादेश!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

हेक्‍टरी आठ हजारांची रक्कम मिळण्यापूर्वीच त्याने राज्यपालांना बोधेगाव येथील टपाल कार्यालयातून स्पीड पोस्टाद्वारे धनादेश पाठविला आहे. धनादेशाबरोबरच रवींद्र याने राज्यपालांना पत्रही लिहिले आहे.

शेवगाव : परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी नुकतीच मदत जाहीर केली; मात्र ही मदत तुटपुंजी असून, त्यातून मशागतीचा खर्चही निघणार नाही. त्यामुळे हेक्‍टरी एक लाखापर्यंत मदतीत वाढ करावी, अशी मागणी युवा शेतकरी रवींद्र रावसाहेब देशमुख (रा. उमापूर, ता. गेवराई) याने केली आहे.

राज्यपालांनी जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीबाबत नाराजी व्यक्‍त करीत, खात्यावर प्रत्यक्ष नुकसान भरपाई जमा होण्यापूर्वीच त्याने आठ हजार रुपयांचा धनादेश स्पीड पोस्टाद्वारे राज्यपालांना पाठविला आहे. 

परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यपाल कोश्‍यारी यांनी नुकसानग्रस्त पिकांसाठी नुकतीच मदतीची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना प्रतिगुंठा अवघी 80 रुपये मदत मिळत आहे. शेतकऱ्यांना किमान हेक्‍टरी एक लाख रुपये भरपाई देण्याची मागणी रवींद्र देशमुख याने केली आहे.

हेक्‍टरी आठ हजारांची रक्कम मिळण्यापूर्वीच त्याने राज्यपालांना बोधेगाव येथील टपाल कार्यालयातून स्पीड पोस्टाद्वारे धनादेश पाठविला आहे. धनादेशाबरोबरच रवींद्र याने राज्यपालांना पत्रही लिहिले आहे.

हेक्‍टरी एक लाख रुपये अनुदान द्या

शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये अनुदान मिळावे, खरीप हंगामासह सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीप पिकांचा विमा तत्काळ लागू करावा आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम वार्षिक 60 हजार रुपये करावी आदी मागण्या पत्रात केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer sends check to Governor