पत्नी आणि दोन मुलांसंह शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

- गुणोरे (ता. पारनेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने आज पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांसह गळफास घेऊन पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली.
-
 पत्नी आणि मोठ्या मुलाचे सततचे आजारपण तर त्यातून निर्माण झालेल्या अर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

निघोज : गुणोरे (ता. पारनेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने आज पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांसह गळफास घेऊन पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. पत्नी आणि मोठ्या मुलाचे सततचे आजारपण तर त्यातून निर्माण झालेल्या अर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ भयचकीत झाले असून, बढे यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली आहे.

बाबाजी विठ्ठल बढे (वय 35), त्यांची पत्नी कविता बढे (वय 34), मोठा मुलगा आदित्य (वय 16), लहान मुलगा धनंजय (वय 14), अशी यातील मयत चौघांची नावे आहेत. बढे यांची चुलत बहिण रेखा गागरे आज सकाळी दूध आणण्यासाठी बढे यांच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांना बढे यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. रेखा हिने याची माहिती पती सुभाष गागरे यांना दिली. सुभाष यांनी घटनास्थळी पोचून बढे यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गागरे यांनी बढे यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले. समोरचे दृश्‍य पाहून गागरे भयचकीत झाले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना आणि ग्रामस्थांचा घटनेची कल्पना दिली. ग्रामस्थांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस पथकही तातडीने दाखल झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा सुरु आहे.

तरुण शेतकरी बाबाजी यांची पत्नी कविता गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांचा मोठा मुलगा आदित्य अपंग होता. तो देखील आजारी असल्याने घरीच असायचा. त्यात घरची आर्थिक स्थितीही हालाखीची होत गेली. बाबाजी यांच्याकडे चार गायी आहेत. त्यावरच बढे कुटुंबाची गुजराण होती. सारखी दुष्काळी स्थिती असल्याने शेतामध्येही फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यातच बाजारभाव मिळत नसल्याने अर्थिक स्थिती कमकुवत होत गेली. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार झाले.

दरम्यान, या घटनेत बाबाजी यांनी अगोदर पत्नी आणि दोन मुलांना गळफास दिला. त्यानंतर स्वत: गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicides with wife and two children

टॅग्स