धडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची!

Dabade-Mane
Dabade-Mane

सातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे धाडस केले आहे. सध्या बटाट्याचे पीक जोमात असून उत्पादनही चांगले निघेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांसह या युवकाला आहे. 

शेनवडी (ता. खटाव) येथील रहिवाशी असलेल्या अरुण शिवाजी दबडे-माने असे या युवकाचे नाव. त्यांचे बालपण मुंबईत गेले. बी.कॉम.नंतर त्यांनी एम.बी.ए. केले. मुंबईतच कंपनीत त्यांना नोकरी लागली. या कंपनीकडून पेप्सीको कंपनीला माल पुरवठा होत होता. पेप्सीको कंपनीतील अधिकाऱ्यानेच अरुण यांना गावाकडे बटाटा उत्पादन घेण्याचा सल्ला दिला.

२००६ मध्ये त्यांनी करार शेतीवर बटाटा उत्पादन घेतले. शेतीतून चांगले उत्पन्न मिळते, असा विश्‍वास निर्माण झाल्याने त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याबरोबरच ‘पेप्सीको’ कंपनीचे बटाटा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी म्हासुर्णे येथे माने हुंडेकरी या नावाने कार्यालयही सुरू केले.

लहरी हवामानाचा फटका इतर पिकांबरोबरच बटाट्यालाही बसला. त्यामुळे उत्पादन कमी येत असल्याच्या सबबीखाली काही शेतकऱ्यांनी बटाट्याचे उत्पादन घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बटाट्याचे क्षेत्रही कमी होऊ लागले. तंत्रज्ञानाचा वापर, समतोल आहार व कष्टाची तयारी ठेवली तर चांगले उत्पन्न मिळू शकते, असा अरुण यांना विश्‍वास होता. हा विश्‍वास शेतकऱ्यांत रुजवण्याचा निश्‍चय त्यांनी केला. खातवळ (ता. खटाव) येथील सुनील फडतरे यांना बरोबर घेऊन ‘शेअर फार्मिंग’साठी शेतकऱ्यांना तयार केले. करार शेतीतून बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरले. शेतकऱ्यांची टीम तयार झाल्यानंतर सुमारे ४० एकर क्षेत्रात बटाटा लागवड करण्यात आली. या संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात आले आहे. शेतकरी व त्यांच्या मुलांना मदतीला घेऊन वेळच्यावेळी मशागत, औषध फवारणी केल्याने सध्या बटाट्याचे पीक जोमात आले आहे. फुलोऱ्यात आलेले हे पीक पाहून शेतकरीही आनंदित आहेत. अरुण यांचे भाऊ अतुल व नीलेश हे स्वतः शेतकऱ्यांबरोबर झटत आहेत. व्यवसाय सांभाळत अरुणही भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताहेत. या सर्वांच्या प्रयत्नातून बटाट्याचे पीक भरात आले आहे. या पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांच्यात निर्माण होत असल्याने अरुण यांचा मुख्य उद्देश सफल होत असल्याचे दिसते.

समतोल आहार व कष्ट करण्याची तयारी ठेवली तर कोणत्याही पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते, हा विश्‍वास शेतकऱ्यांत निर्माण करण्यासाठी हे धाडस केले आहे. यंदा बटाट्याचे चांगले उत्पन्न निघेल, असा विश्‍वास आहे.
- अरुण दबडे-माने, प्रगतशील शेतकरी व व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com