राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

तात्या लांडगे
गुरुवार, 7 जून 2018

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची सुमारे एक हजार 400 लेखापरीक्षकांमार्फत फेरपडताळणी होणार आहे. तसेच लाभ न मिळालेल्या यलो लिस्टमधील शेतकऱ्यांची सध्या पडताळणी सुरू असून त्यांना लवकरच लाभ मिळेल, असे सहकार विभागाचे मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

सोलापूर : कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या राज्यातील 78 लाख 38 हजार 658 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्‍त 37 लाख 39 हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. कर्जमाफीला 28 जून रोजी वर्ष पूर्ण होत असूनही आणखी सुमारे 41 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत. 

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली. परंतु, नेमक्‍या थकबाकीदार व कर्जदार शेतकऱ्यांचा शोध घेण्याकरिता त्यांच्या माहितीचे गावोगावी चावडी वाचन करण्यात आले. त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी झाली. बॅंकांकडून वेळोवेळी माहितीही घेतली. तरीही बहुतांशी शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीसाठी पात्र आहोत की नाहीत याचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून कर्ज भरण्याकरिता तगादा लावला जात आहे. तसेच नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत. 

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची सुमारे एक हजार 400 लेखापरीक्षकांमार्फत फेरपडताळणी होणार आहे. तसेच लाभ न मिळालेल्या यलो लिस्टमधील शेतकऱ्यांची सध्या पडताळणी सुरू असून त्यांना लवकरच लाभ मिळेल, असे सहकार विभागाचे मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

आकडे बोलतात... 
राज्यातील एकूण शेतकरी 
1,36,00000 
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी 
89,00,000 
कर्जमाफीसाठी तरतूद 
34,022 कोटी 
ऑनलाइन अर्जदार 
77,05,980 
मुदतवाढीतील अर्जदार 
1,32,678 
बॅंकांना पाठविलेली यादी 
46,50,000 शेतकरी 
रक्‍कम मिळालेले 
37,39,000 शेतकरी 
अदा केलेली रक्‍कम 
14,950 कोटी 
शिल्लक शेतकरी 
40,99,658

Web Title: farmer waiting for loan waiver in Maharashtra