कडकनाथ कोंबडीच्या घोटाळेबाजांना मोका लावण्याची मागणी

कडकनाथ कोंबडीच्या घोटाळेबाजांना मोका लावण्याची मागणी

इस्लामपूर - कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला. महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांसह या घोटाळ्यातील सुत्रधारांवर मोकांतर्गत कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली.  

कमी गुंतवणूकीत कडकनाथ कोंबडी पालन करुन जादा पैसे कमवण्याचे अमिष दाखवत कर्नाटकसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या कंपनीने फसवणूक केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक व केरळ मधून फसवणूक झालेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विविध ठिकाणाहुन आलेले शेतकरी जमा झाले. येथे आपली कशी फसवणूक झाली, या बाबतची कैफियत सर्वांसमोर मांडली. त्यानंतर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांचा निषेध असो ’ अशा घोषणा देण्यात आल्या. 

मोर्चेकरांना पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारवरच अडविण्यात आले. यावेळी काही शेतकर्‍यांनी आजच्या आज संबंधितांवर गुन्हा दाखल करुन आम्हाला त्या फिर्यादीची प्रत द्यावी, असा आग्रह धरला. प्रहार संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, पुरोगामी चळवळ, मराठा क्रांती मोर्चा व काही स्थानिक संघटनांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. 

पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी संबंधीतांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची ग्वाही मोर्चेकर्‍यांना दिली. प्रत्येकाने आपल्या तक्रारीचा अर्ज जमा करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले.

यावेळी शेकडो अर्ज जमा झाले. या अर्जावरुन संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करु, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले. या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांनी पैसे कसे जमा केले याचा पाढाच पोलिसांच्यासमोर वाचला. साधे पाकीट मारले तर तात्काळ गुन्हा दाखल होतो, मग आमचाही गुन्हा आजच्या आज दाखल करा असा आग्रह धरला.

गोटखिंडी येथील पारधी समाजातील ममताज पवार म्हणाल्या, “ माझा नवरा चोरीमारीच्या भीतीने उसात व शेतात राहुन मरण पावला. पोरं जगवण्यासाठी आम्ही चोरीचा मार्ग सोडून समाजात चांगल्या मार्गाने जगायचं असं ठरवले. मात्र महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या अमिषाला बळी पडून गोटखिंडी येथे कडकनाथ कोंबडीचे शेड केले. कर्ज काढून, उसने पैसे घेऊन 2 लाख रुपये गुंतवणूक केली. 2 - 2 किलो मीटर अंतरावरुन पाणी आणून कोंबड्यांना पाजले. आणि आता कंपनीने आमचा माल स्वीकारण्यास व पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. आता आम्ही जगायचं कसं?

मराठवाड्यातून आलेला एक युवा शेतकरी आपली कैफियत मांडताना म्हणाला, ‘ मी सुशिक्षीत बेकार आहे. दुष्काळ आमच्या पाचवीला पुजला आहे. नोकरी लागत नाही म्हणून रयत अ‍ॅग्रो कंपनीच्या अमिषाला बळी पडत तीन लाख रुपये कर्ज घेतले. कडकनाथ कोंबडी पालन केले. आज आमचे घरदार यातून बाहेर पडण्याच्या विवंचनेत आहे. कंपनीने आमची मोठी फसवणूक केली. आता मला आत्महत्त्येशिवाय पर्याय नाही.”

“ महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या कडकनाथ घोटाळ्यात अनेक मोठ्या हस्तींचा सहभाग आहे. त्याची सखोल चौकशी होऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा यापुढे या लोकांना न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडू.”

- दिग्वीजय पाटील, मराठा क्रांती मोर्चा


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com