सहा महिन्यांनी उकरला शेतकऱ्याचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

17 मे रोजी ही घटना घडली होती. या घटनेत सतीश उर्फ सत्तू कांबळे (वय 57) यांचा मृत्यू झाला आहे. परंतु, त्यावेळी त्यांच्या वारसांकडून रितसर पोलिसात वर्दी न देता परस्पर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

दुगूनवाडी ( कोल्हापूर ) : गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील हरळीजवळ सहा महिन्यापूर्वी पेटते झाड अंगावर पडून मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसात वर्दी दिली नव्हती. गावातच त्याच्यावर दफनविधी केला. दरम्यान, विम्यासाठी शवविच्छेदन अहवाल आवश्‍यक असल्याने त्याच्या पत्नीने दोन दिवसापूर्वीच पोलिसात रितसर वर्दी दिली. यामुळे सहा महिन्यापूर्वी दफन केलेल्या मृतदेहाचे हाडे बाहेर काढून ती तपासणीसाठी सीपीआरला पाठविण्यात आले. 

हेही पाहा - ताम्रपर्णी नदीच्या पात्रात या ठिकाणी मगरीचे दर्शन 

याबाबतची माहिती अशी, 17 मे रोजी ही घटना घडली होती. या घटनेत सतीश उर्फ सत्तू कांबळे (वय 57) यांचा मृत्यू झाला आहे. परंतु, त्यावेळी त्यांच्या वारसांकडून रितसर पोलिसात वर्दी न देता परस्पर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान विमा मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची पत्नी श्रीमती महादेवी कांबळे हिने सतीश यांच्या मयताची रितसर वर्दी 20 नोव्हेंबर रोजी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी दफन केलेला मृतदेह उकरून काढण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेण्यात आली.

हेही वाचा -  लाकडी कपाट अंगावर पडले अन् घडला हा अनर्थ 

मृतदेहाची हाडे तपासणीसाठी कोल्हापूरला

आज दुपारी नायब तहसीलदार अशोक पाटील, मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बी. पी. सातपुते, तलाठी सुनिता गवारी, ग्रामसेवक भूषण वरूटे, पोलिस पाटील बबन कुपेकर, उपसरपंच दशरथ कुपेकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक टक्केकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेहाची हाडे शवविच्छेदनासाठी पोलिस हवालदार संभाजी कोगेकर, कॉन्स्टेबल दिपक किल्लेदार यांनी ताब्यात घेतले. मृत्यूनंतर सहा महिने उलटल्याने स्थानिक पातळीवर शवविच्छेदन होवू शकत नसल्याने मृतदेहाची हाडे घेवून पोलिस शवविच्छेदनासाठी सीपीआरकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Dead Body Recover After Six Month For Insurance