
Sangali News : शेतकरीच करतोय जमिनीचे वाळवंट?
किल्लेमच्छिंद्रगड : शेणखताचे दर एका डंपिंगला तीन हजार रुपयांच्या पुढे गेल्याने शेतीस शेणखत घालणे परवडेना, त्यातच पिकाची हमखास वाढ करणारे मळीमिश्रित पाणी स्वस्तात मिळत असल्याने त्याचा वापर वाढू लागला असला, तरी शेतीमधील सूूक्ष्म जीवाणू नष्ट होऊन मातीची राख होऊ लागली आहे.
अशीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काही वर्षांत पिकाऊ शेतजमिनी नापीक राहून पडीक होण्याचा धोका तयार होऊ लागला आहे.
पिकांची झटपट वाढ आणि अधिक उत्पन्नाच्या आशेने वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील ताकारी, भवानीनगर, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, बिचूद गावामध्ये शेणखतास पर्याय म्हणून साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी पर्यायी खत म्हणून वापरण्याची जणू शेतकरी वर्गात स्पर्धाच लागली आहे.
मळीमिश्रीत पाण्याचा वापर आता सर्रास नदीकाठच्या गावातही होऊ लागल्याने भूगर्भात मुरलेल्या पाण्याचा पाझर कृष्णा नदीत होऊन नदीचे पाणीही कायमस्वरुपी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांधारीची भूमिका घेतल्याने मळीमिश्रीत पाण्याचा वापर उघडपणे सुरू झालाय. अनेकदा तक्रारी होऊनही तात्पुरती मलमपट्टी करून प्रदूषणाचा फैलाव करणाऱ्यांना अभय दिले जातेय.
ज्या शेतात उसासह अन्य रब्बी, खरिपाची पिके घेतल्यानंतर शेतीस दिलेल्या सिंचनाच्या; तसेच पावसाच्या पाण्याबरोबर या दूषित मळीमिश्रीत पाण्याचा पाझर नजीकच्या ओढ्यात लागतो. पाझराच्या पाण्याची चव कधी गोड, तर काही वेळेस तुरट लागते. हेच पाणी ओढ्याद्वारे कृष्णा नदीस जाऊन मिळते आणि नदी प्रदूषित करते.
मळीमिश्रित पाण्याने भूगर्भातील पाणी खराब होण्याबरोबर विहिरी, विंधन विहिरीमधील पाणी प्रदूषित झाले आहे. जनावरांना हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तर मानवाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागल्याने एटीएमद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. साखर कारखान्यांनी मळीमिश्रित पाण्याची निर्जनस्थळी विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराकरवी उपाययोजना केलेली असते. ठेकेदार वाहतुकीत बचत करण्यासाठी; तसेच टँकरमागे एक हजार रुपये अतिरिक्त मिळत असल्याने मळीमिश्रित पाण्याची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करून मालामाल होत असल्याचे दिसून येते.
मळीमिश्रीत पाण्याने सोन्यासारख्या जमिनी नापीक होऊन जमिनीचं वाळवंट तयार होऊ लागलं आहे. बगलबच्च्यांना पोसण्यासाठी साखर सम्राटांनी मळीमिश्रीत पाण्याचा धंदा सुरु केलाय. जमिनीची राख करणारे हे पाणी शेतकऱ्यांनी वापरू नये. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि साखर सम्राटांनी शेतकऱ्यांस देशोधडीला लावणारे हे उद्योग तत्काळ थांबवावेत; अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ.
भागवत जाधव, अध्यक्ष, वाळवा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना