सरकारने डोळं फोडून जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी : शेतकऱ्यांची व्यथा

अक्षय गुंड
रविवार, 19 मे 2019

यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय' अर्धेपोटी जगुन, महागडा चारा आणुन जनावरे जगवतोय. दुष्काळात माणसं नाय ओ.. जनावर मरतीत. सरकार आता जाग झालयं.. मुळात या सराकाराचे शेतकऱ्यांच्या उलट धोरण आहे. मोदी तर शेतकऱ्यांसाठी राजनेता नसून व्यापारीनेता आहे. जनावर एवढ श्रेष्टत या भूमीत काय-बी नाय त्यामुळे सरकारने जनावरं जगवलीच पाहिजे. नाय तर, तुमच्या राजकारणाला अर्थ नाय

उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय' अर्धेपोटी जगुन, महागडा चारा आणुन जनावरे जगवतोय. दुष्काळात माणसं नाय ओ.. जनावर मरतीत. सरकार आता जाग झालयं.. मुळात या सराकाराचे शेतकऱ्यांच्या उलट धोरण आहे. मोदी तर शेतकऱ्यांसाठी राजनेता नसून व्यापारीनेता आहे. जनावर एवढ श्रेष्टत या भूमीत काय-बी नाय त्यामुळे सरकारने जनावरं जगवलीच पाहिजे. नाय तर, तुमच्या राजकारणाला अर्थ नाय.''अशी तळमळीने व्यथा उपळाई बुद्रूक येथील ७५ वर्षीय दाजी दगडु शिंदे यांनी 'सकाळ' शी बोलताना मांडली.
 
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने माळरान पडीक तर इतर ठिकाणीही चारा उगवला नाही. त्यामुळे पशुधनाची होरपळ होत आहे. दिवसभर जनावरांचा हंबरडा ऐकुन शेतकऱ्यांचा मन हेलावून टाकत आहे. लेकरागत सांभाळलेल्या जनावरांची पोट या दुष्काळामुळे पाटिला जाताना दिसत आहे. बाजारात विकावी तर कवडीमोल भाव येतोय. त्यामुळे गेली ४ महिन्यापासुन शेतकर्यांनी १० रूपये टक्क्यांनी पैसे व्याजाने काढुन जनावरे जगवत असल्याचे शेतकरी सांगतात. लोकसभेच्या निवडणुका आल्या प्रचार सुरू झाला. पण शेतकऱ्यांच्या समस्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मे महिन्यात सरकारला व शासनाला शेतकऱ्यांची आठवण झाली अन् चारा छावण्या सुरू करायला सुरूवात केली. परंतु शासनाच्या आडमुठी भुमिका व जाचक अटीमुळे चारा छावण्या उभ्या राहुन देखील जनावरांच्या दावणीला ना चारा ना वाडा असल्याचे दिसुन येत आहे.                

माढा तालुक्यात शासनाच्या वतीने या आठवड्याभरात गरजेनुसार चारा छावण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा परंतू, एका रेशनकार्ड वर ५ च जनावरे तसेच छावणीत ३०० जनावरे उपलब्ध होत नाहीत. तोपर्यंत चारा नाही. या जाचक अटींमुळे शेतकऱयांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही शेतकऱ्यांची ५ पेक्षा अधिक जनावरे असल्याने चारा छावणीत त्यांची चांगलीच तांराबळ उडत आहे. चारा छावण्या सुरू होऊन ३ ते ४ दिवस उलटले तरी अद्यापही काही छावण्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला दिसत नाही. त्यामुळे सरकारने चारा छावण्या करून शेतकऱ्यांना जणु गाजर दाखवण्याचेच काम केले आहे. जर सरकार शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणार असेल तर, सरकट ५ पेक्षा अधिक जनावरांना छावणीचा लाभ द्यावा. छावणीत उपलब्ध असतील तेवढ्या जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

''चारा छावणीबाबत एक कुटूंब ५ जनावरे व ३०० जनावरे उपलब्ध झाल्यानंतर चारा उपलब्ध हे शासन धोरण असुन यात काही बदल करता येणार नाही.''
- राजेश चव्हाण तहसीलदार माढा

''उपळाई बुद्रूक भागात सर्व व्यवहार हा जनावरांच्या भांडवलावर चालतो. तरी शासनाने ५ जनावरांची चारा छावणीसाठी ३०० जनावरांची अट वगैरे न घालता सरसकट सर्व जनावरांना छावणीचा लाभ द्यावा.'' 
- संजय नागटिळक, सरपंच उपळाई बुद्रूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers facing fodder issue due to drought