शेतकऱ्यांना पाच रुपयांत पोटभर जेवण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मेनू 
 तीन चपात्या , दोन भाज्या , भात,  लोणचे , चटणी 

सांगली - अन्नदाता सुखी भव, असं म्हणताना शेतकऱ्यांच्या जीवावर कोट्यवधीचा व्यवहार करणारी बाजार व्यवस्था त्यांच्या सुखसोईसाठी करते काय, असा प्रश्‍न सतत उपस्थित होत होता. त्यावर उत्तर शोधताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय आज घेतला. रोटरी क्‍लब, अडते आणि बाजार समितीने ही जबाबदारी उचलली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले असून महिनाभरात योजना सुरू होईल, असे सभापती प्रशांत शेजाळ यांनी सांगितले. 

सांगली बाजार समितीचे वसंतदादा मार्केट यार्ड उतारपेठ आहे. दरवर्षीची उलाढाल सुमारे बाराशे कोटींवर आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणातील शेतकऱ्यांचा येथे वावर असतो. हळद, बेदाणा आणि धान्य व्यापारासाठी ते येथे येतात. जत, आटपाडी, खानापूर, शिराळा, वाळवा, कडेगाव अशा लांबच्या तालुक्‍यांतून शेतकऱ्यांची वहिवाट आवारात आहे. कर्नाटकातील आंबा उत्पादकांसह पश्‍चिम महाराष्ट्रातील फळउत्पादक शेतकरी विष्णूअण्णा फळ मार्केटला येतो. मिरजेच्या जनावरे बाजारात शेकडो शेतकऱ्यांची ऊठबस असते. या शेतकऱ्यांना दुपारचे जेवण स्वस्तात आणि उत्तम दर्जाचे मिळाले पाहिजे, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. 

सांगली बाजार समिती मुख्य कार्यालयासमोर वैरण अड्डा आहे. तेथे रोटरी क्‍लबला 10 बाय 15 फुटांची जागा दिली जाईल. तेथे अन्नछत्र उभे केले जाईल. त्यात शेतकऱ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था असेल. शेतकऱ्यास अडत्याकडून एक चिठ्ठी घ्यावी लागेल. शेतकऱ्यासोबत आणखी कुणी असेल तर त्याला चिठ्ठी द्यायची किंवा कसे, याचा निर्णय अडते वस्तुस्थिती तपासून घेतील. 

निविदा मागवणार 
जेवण पुरवठ्यासाठी बाजार समितीकडून निविदा मागवल्या जाणार आहेत. एका ताटाची किंमत किती असेल, यावर रोटरी क्‍लब, बाजार समिती आणि अडते यांचा समान वाटा असेल. शेतकऱ्यांना फक्त पाच रुपये द्यावे लागतील. या व्यवहाराचे संपूर्ण लेखापरीक्षणही केले जाईल. 

अडत्याची चिठ्ठी हवीच 
पाच रुपयांत पोटभर जेवण ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जेवण घेताना केंद्रात अडत्याने दिलेली चिठ्ठी जमा करावी लागेल. अडते स्वतः जेवणखर्चाचा सुमारे 30 टक्के वाटा उचलणार असल्याने त्यात गफलत होण्याची शक्‍यता कमी असेल.

Web Title: Farmers five rupees a full meal