यंदाचा हंगाम तीन महिने चालणार ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

  उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाची होणार पळवापळवी; जादा दराची शेतकऱ्यांना आशा.

सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा परिणाम ऊस शेतीवर झाल्याने यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अडीच महिने उशिरा सुरू होणार आहे. साखर संघ आणि कारखान्यांनी 15 डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू करण्याचा परवाना साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितला आहे. ऊस कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने साधारण तीन ते चार महिनेच हंगाम चालणार असल्याचे कारखान्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात गाळपासाठी 80 हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध होता. यातील महापुरामुळे 20 टक्‍क्‍यांहून अधिक ऊस खराब झाल्याने गाळपावर परिणाम होणार आहे. 
 

ऊस शेतीचे प्रमाण अधिक असलेल्या कऱ्हाड, पाटण आणि सातारा तालुक्‍यांत यावर्षी पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले. उसाचे पीक पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाया गेला आहे. सर्वाधिक कारखाने कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत आहेत. तसेच सातारा तालुक्‍यातही एक साखर कारखाना आहे. वाई व सातारा तालुक्‍यांचा काही भाग वगळता कऱ्हाड, पाटणमधील उसाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम यंदाच्या गाळप हंगामावर होणार आहे. तसेच अद्यापही शेतामध्ये पाणी असून, तुरळक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी कारखान्यांचा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार आहे.

एरव्ही ऑक्‍टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये कारखान्याची धुराडी पेटत होती. यावर्षी कारखाने डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. कारखान्यांनी डिसेंबरमध्ये हंगाम सुरू करण्याचा परवाना साखर आयुक्तांकडे मागितला आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्याची धुराडी पेटणार आहेत. उसाच्या शेतात पाणी असल्याने ऑक्‍टोबरमध्ये कारखाने सुरू करणे परवडणारे नाही. कारण कारखान्यांना अपेक्षित साखर उतारा मिळणार नाही. डिसेंबरमध्ये कारखाने सुरू केल्यास किमान उतारा तरी चांगला मिळेल आणि उत्पादनाची तोंडमिळवणी होणार आहे. 

जिल्ह्यात तीनही हंगामातील मिळून 80 हजार 317 हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. यापैकी 20 टक्के म्हणजेच 15 ते 16 हजार हेक्‍टरवरील ऊस महापुरामुळे खराब झाला आहे. त्यामुळे गाळपाची गणिते चुकणार आहेत. यातच या हंगामात 16 कारखाने गाळप करण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनी तयारीही करून ठेवली आहे.

गाळपास उपलब्ध उसास आडसाली 20 हजार 355, पूर्वहंगामी 19 हजार 440, सुरूचा 12 हजार 802, खोडवा 27 हजार 718 हेक्‍टर ऊस उपलब्ध होता. त्यातील नदीकाठचा ऊस पुरात बाधित झाला आहे. त्यामुळे यावर्षी कारखान्यांचा हंगाम दोन ते अडीच महिने उशिरा सुरू होणार आहे. तीन ते चार महिन्यात हंगाम संपणार आहे. 

ऊसदर जादा मिळण्याची शक्‍यता
 
कोल्हापूर आणि सांगली येथे महापुरामुळे उसाचे क्षेत्र बाधित झाल्याने तेथे ऊस उपलब्धता खूपच कमी झाली आहे. त्यामुळे हे कारखाने सातारा जिल्ह्यातील ऊस पळविण्याची शक्‍यता आहे. सातारा जिल्ह्यातील कारखान्यांची वाढती संख्या लक्षात घेता गाळपास ऊस कमी पडणार आहे. यामुळे सर्व गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाची पळवापळवी करावी लागणार आहे. या पळवापळवीमुळे शेतकऱ्यांना ऊसदर जादा मिळण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers hope for higher rates for sugarcane