गोविंद बाग ठरविणार शेतकर्‍यांचं भलं

Sugar Cane
Sugar Cane

सातारा : साखर कारखाने सुरू होऊन 15 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला तरी एकाही कारखान्याने या हंगामात गाळप केलेल्या उसाला पहिली उचल जाहीर केलेली नाही. सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गळीत सुरू ठेवले आहे. तसेच ओला दुष्काळ, अतिवृष्टी भरपाई आणि कर्जमाफी आदींबाबत शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी शेतकरी संघटना व किसान मंचचे पदाधिकारी उद्या (रविवारी) बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

कारखान्याने दर जाहीर केला नाही

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळाली. पण, ती तुटपुंजी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास सरसकट कर्जमाफी देण्याबाबत आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले होते. याबाबत सरकार काय भूमिका घेणार, याची शेतकऱ्यांत उत्सुकता आहे. तसेच सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून सर्व कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस नेऊन 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. तरीही एकाही कारखान्याने आपली पहिली उचल आणि अंतिम दर जाहीर केलेला नाही. एफआरपीच्या नावाखाली शेतकऱ्यांची कारखाने फसवणूक करत आहेत. 

शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर पडणार

याबाबत शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मात्र, कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पण, राज्यात सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली तरी शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर पडणार आहे. हे सर्व मुद्दे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पुढे मांडण्यासाठी शेतकरी संघटना व किसान मंचचे पदाधिकारी उद्या (रविवारी) बारामतीत जाणार आहेत. ते गोविंद बागमध्ये खासदार शरद पवार यांची भेट घेऊन या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. 

हे भेटणार..

यामध्ये शेतकरी संघटना व किसान मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार शंकरराव धोंडगे, कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे, कोल्हापूरचे प्रकाश पाटील, सोलापूरचे सिद्धेश्‍वर हेंबाडे, नगरचे विठ्ठलराव शेळके, रूपचंद गाला, नाशिकचे खेमराज कौर, पुण्याचे बाळासाहेब घाडगे, संगीता मोडक, उस्मानाबादचे रामजीवन बोंदर, बीडचे परमेश्‍वर पिसोरे, विदर्भातून कैलास डांगे, नांदेडचे दत्तानाना पवार, लातूरचे विनायकराव पाटील यांचा समावेश आहे. 

सकारात्मक तोडगा निघेल... 

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत लढा उभारण्याऐवजी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सत्तेत सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वालीच उरला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी संघटना किसान मंचचे पदाधिकाऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून खासदार शरद पवारांपुढे कैफियत मांडण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा आहे. 


- शंकरराव गोडसे (कार्याध्यक्ष, किसन मंच) 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com