माशाच्या नव्या प्रजातीला शेतकऱ्याचे नाव 

fish.gif
fish.gif

आजरा  : आंबोली परिसरात उगम पावणाऱ्या हिरण्यकेशी नदीमध्ये घाटकरवाडी गवसे (ता. आजरा) भागात छोटी खवली (स्माल बार्ब) या पेथिया वंशातील माशाच्या नव्या प्रजातीचा शोध नुकताच लागला आहे. हिरण्यकेशीतील या नव्या प्रजातीचे सामान्य नाव हे घाटकरवाडी येथील शेतकरी आणि निसर्गप्रेमी प्रकाश शिवाजी तांबेकर यांच्या सन्मानार्थ प्रकाशबार्ब हे नाव देण्यात आले. तांबेकर हे शेतकरी असून निसर्ग संवर्धनाबद्दल जागरुक आहेत. 

प्रकाशबार्ब हा विशेष मासा फक्त हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाजवळ व जवळील ओढ्यामध्ये जिथे पाण्याचा प्रवाह संथ आहे, तिथे आढळतो. शास्त्रज्ञांनी जेव्हा पाण्यामध्ये या माशाचे निरीक्षण केले, तेव्हा असे आढळून आले की, ही माशाची नवीन प्रजाती खूप दुर्मिळ आणि संख्येने कमी आहे. हा मासा 2014 मध्ये याच नदीमध्ये सापडलेल्या लांब शेपटीचे खवले या माशांच्या समूहासोबत रहातो आणि इतर शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करतो. या दोन्हीही प्रजाती सह्याद्री पर्वतरांगेमधील स्थानिक प्रजाती असून हिरण्यकेशीमध्ये सापडणाऱ्या माशांची संख्या आता 58 इतकी झाली आहे.

मागील चार वर्षांपासून बॉम्बे नॅचरल ही हिस्टरी सोसायटी मुंबईचे उन्मेष कटवटे, पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍन्ड रिसर्चचे डॉ. निलेश डहाणूकर, केरळ फिशरीइझ ऍन्ड ओसिएन युनिव्हर्सिटीचे डॉ. राजीव राघवन, पुण्याच्या मॉडर्न कॉलेजचे प्रदीप कुमकर या शास्त्रज्ञांची टीम हिरण्यकेशी नदीमध्ये संशोधन करीत आहेत. संशोधनासाठी प्रकाश तांबेकर यांनी सहकार्य केले आहे. हिरण्यकेशी नदी तिच्या आसपासच्या घनदाट जंगलातील ओढे यामध्ये आढळणारी स्थानिक आणि दुर्मिळ मासे यांची ओळख ही फक्त तांबेकर यांच्यामुळे झाली. 
 
एका माशाच्या प्रजातीला माझ्यासारख्या सामान्य शेतकरी व निसर्गप्रेमीचे नाव देणे हा मोठा सन्मान आहे. हा मासा मला दीड वर्षापूर्वी आढळला होता. तो शास्त्रज्ञांच्या टीमला दाखविला. त्यांच्यासोबत या परिसरात फिरून काम करता आले. संशोधनाला हातभार लावता आला ही समाधानाची बाब आहे. 
- प्रकाश तांबेकर 

स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा 
निसर्ग संवर्धनासाठी स्थानिक रहिवाशांचा संशोधनातील सहभाग महत्त्वाचा आहे. जो तांबेकर यांनी दाखवून दिला आहे. हा शोध निबंध झू टॅक्‍झा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये 18 जून रोजी प्रकाशित झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com