शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरिणाच्या पाडसाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

वन्य जीवाचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणून मी ते बजावले. आपण सतर्क राहून वन्यजीवांचे रक्षण केले. तरच आपल्या भावी पिढीला ते पाहायला मिळतील.

-  महेंद्र गजघाटे, शेतकरी

मोहोळ : नजिक पिंपरी ता. मोहोळ येथील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. मोहोळ पोलिस ठाण्यामार्फत सदरचे पाडस वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या संदर्भात अधिक माहिती अशी, की नजिक पिंपरी येथील शेतकरी महेंद्र रेवणसिद्ध गजघाटे (22) हे आपल्या शेताकडे जनावरांना चारा आणण्यासाठी चालले होते. तेव्हा शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही मोकाट कुत्री घोळक्याने कशाचा तरी पाठलाग, करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा गजघाटे यांनी मोटारसायकल थांबवून कुत्र्यांना हुस्कावून लावले व जवळ जाऊन पाहिले तर अंदाजे पाच सहा दिवसांचे हरणाचे पाडस दिसले. त्यांनी त्याला घरी नेले व त्याला चारापाणी दिला.

गजघाटे यांनी आपले मोहोळ येथील सहकारी भीमराव तुकाराम राऊत यांनासोबत घेऊन सोमवारी सकाळी मोहोळ पोलिस ठाण्यात आले व सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्याशी संपर्क करून त्यांना सर्व हकीकत सांगितली. बोधे यांनी तातडीने वनरक्षक सचिन कांबळे, वनमजूर दत्ता जाधव यांच्याशी संपर्क करून त्या हरणाच्या पाडसास त्यांच्याकडे  सुपुर्द केले. तसेच वन्य जीवाचे प्राण वाचविण्याचे सामाजिक काम केल्याबद्दल पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते गजघाटे यांचा सत्कार केला.

नजिक पिंपरीच्या शेतकऱ्याप्रमाणे सर्वांनी खास करून युवकांनी सतर्क राहून वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे. अनेक सामाजिक हिताची कामे केली पाहिजेत. इतर कोणत्याही ठिकाणी, वन्यजीवाचे रक्षण करताना अडचण आल्यास मोहोळ पोलिस ठाण्याचे सहकार्य राहील.

- विक्रांत बोधे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मोहोळ

Web Title: Farmers Saves Life of Deer in Mohol