मुख्यमंत्री फडणवीसांना सांगलीत दाखवले काळे झेंडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जोरदार निदर्शने 

शेतमालाला हमी भाव द्या, ऊसाचा दूसरा हप्ता ५०० द्या, सातबारा कोरा करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची पळापळ झाली. वैभव चौगुले, महावीर पाटील, संजय बेले, अभिजित पाटील या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

सांगली : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत काळे झेंडे दाखवून निदर्शन केले. दोन दिवसांपूर्वीच संघटनेचे अध्यक्ष विकास देशमुख यांनी तसा इशारा दिला होता. आंदोलक कार्यकर्ते महावीर पाटील, संजय बेले, अभिजित पाटील, वैभव चौगुले यांना अटक करण्यात आली. 

भोसे (ता. मिरज) येथे संघटना पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात निदर्शने करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवत नाकेबंदी केली होती. मात्र आज सकाळीच या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रवेश केला होता. चौफेर बंदोबस्त असूनही हे कार्यकर्ते पोलिसांना ओळखता आले नाहीत. मुख्यमंत्री उद्‌घाटन करून बाहेर पडत असताना प्रवेशद्वारावरच अचानकपणे कार्यकर्ते प्रगट झाले. काळे झेंडे दाखवत त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. कर्जमाफीस नकार देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. नियोजित वेळेआधीच अर्धा तास मुख्यमंत्री आले होते. अवघ्या पंधरा मिनिटांचाच हा कार्यक्रम होता. घोषणा सामोरे जातच मुख्यमंत्री दौऱ्यातील अन्य कार्यक्रमासंसाठी रवाणा झाले. 

मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून रस्त्यावरच जाब विचारू. इतर मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जातील. निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची ग्वाही दिली. आता शेतमालाला भावही नीट नाहीत, कर्जमाफी लांबचा विषय आहे. उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा देण्याचे काय झाले? भाजपला बळीराजाने भरभरून मते दिली, ह्यांनी थट्टा मांडली आहे,. हीच मंडळी आता शेतकऱ्यांना शिव्याही देत आहे असा उद्वेग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी तत्काळ दौऱ्यात संघटनेचे सरकारमधील प्रतिनिधी असलेले राज्यमंत्री सदाभाऊ खोत सहभागी नव्हते. पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना अटक केले. घोषणा देतच कार्यकर्ते पोलिस गाडीमध्ये जाऊन बसले. 

नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेने कृषी परिषद घेतली असून या परिषदेसाठी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शेट्टी निमंत्रित वक्ते आहेत. शेट्टींनी भाजप कोट्यातून आमदार व मंत्री झालेल्या सहकारी सदाभाऊ खोत यांना सातत्याने धारेवर धरताना शिवसेनेशी सलगी वाढवली आहे. आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी हा रोख कायम ठेवला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फुर्त स्वागत

दरम्यान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथील हेलिपॅडवर आज दुपारी 12.45 वाजता आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत सहकार, पणन व वत्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.  यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मिरज प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: farmers show black flags to cm fadnavis in sangli