Video : वर्गणी काढून केला शेतकऱ्यांनी विमान प्रवास

निवास मोटे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पोहाळे तर्फ आळते - वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या येथील अनेक शेतकऱ्यांची विमान प्रवास करण्याची इच्छा होती. अखेर ३३ शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी वर्गणी काढून विमानाचे तिकीट बुकिंग केले. 

पोहाळे तर्फ आळते - वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या येथील अनेक शेतकऱ्यांची विमान प्रवास करण्याची इच्छा होती. अखेर ३३ शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी वर्गणी काढून विमानाचे तिकीट बुकिंग केले. 

या शेतकऱ्यांना घरगुती अनेक अडचणी शेतीत होणारे दरवर्षीचे नुकसान दुभत्या जनावरांची गैरसोय सर्व समस्यांमुळे त्यांची विमान प्रवासाची इच्छा राहून गेली होती. काल (ता. ९) शेतकऱ्यांनी जिद्दीने कोल्हापूर ते हैद्राबाद या विमान प्रवासाची भरारी घेतली. याच शेतकऱ्यांनी पुढील ध्येय निश्‍चित केले आहे.
येथील बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय साळोखे यांनी गावातील ३०-४० शेतकऱ्यांचा ग्रुप केला आहे.

दिवसभर शेतात दमून आल्यावर सायंकाळी साळोखे यांच्या घरात या शेतकऱ्यांच्या गप्पा-गोष्टी होतात. याच ग्रुपने महिन्याला एक भिशी सुरू केली आहे. ती केवळ प्रवासासाठी. दरवर्षी हा ग्रुप वेगवेगळी तीर्थक्षेत्रांना भेटी देतो. त्यांनी आजपर्यंत उत्तर भारत, दक्षिण भारत, नेपाळ, बद्रिकेदार, जम्मू-काश्‍मीर या ठिकाणी प्रवास केला आहे. सात वर्षापासून हा ग्रुप स्थापन झाला आहे. दरवर्षी तो पंधरा-वीस दिवसाच्या दौऱ्यासाठी बाहेर जातो.

या सर्व ग्रुपची एकच इच्छा होती की विमानात बसण्याची. मे महिन्यापासून हा ग्रुप विमान प्रवासाच्या बुकींगच्या शोधात होता. इच्छूक असणाऱ्या ३३ शेतकऱ्यांचे ऑनलाइनवर कोल्हापूर-हैदराबाद हे बुकिंग झाले. आणि हे सर्व शेतकरी आकाशात भरारी घेऊन हैदराबाद भागात गेलेत. गुरुवारी त्यांचे गावात आगमन होईल. आता याच शेतकरी लोकांचे पुढचे स्वप्न आहे की विमानातून परदेश दौरा करण्याचे त्या दृष्टीने हा ग्रुप वाटचाल करणार आहे.

आमचा ३०-४० जणांचा ग्रुप आहे. आम्ही रोज एकत्र येऊन सर्व घडामोडींवर चर्चा करतो. आम्ही पूर्ण भारतभर प्रवास केला आहे. आमचे स्वप्न होते ते विमानातून प्रवासाचे. आम्ही कोल्हापूर-हैदराबाद हा प्रवास विमानातून केला आणि आमचे स्वप्न साकार झाले. भविष्यात आम्ही परदेश दौरा करण्याचा प्रयत्न 
करणार आहोत.
- दत्तात्रय साळोखे, 

ग्रामस्थ व ग्रुपचे प्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers travel by plane in Kolhaur special story