वाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले 

दिलीप पाटील
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

वाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे सर्वक्षण न केले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने शासनाचा या धोरणाच्या निषेध म्हणून स्वत:ची भातशेती पेटऊन दिल्याची घटना आज घडली. 

वाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे सर्वक्षण न केले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने शासनाचा या धोरणाच्या निषेध म्हणून स्वत:ची भातशेती पेटऊन दिल्याची घटना आज घडली. 

तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यावर्षी वाडा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता त्यामुळे पेरणी व भातलागवडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही चांगली बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीसाठी आवश्यक असणारा परतीच्या पाऊसाने दडी मारल्याने भाताचा दाणा परिपक्व झाला नाही. भातपिके लाल पडून करपुन गेली. जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे नाहीच परंतु, भाताचा पेंढा सुद्धा हाताला लागला नाही. त्यामुळे तुसे येथील शेतकरी अशोक मोकाशी यांनी नैराश्यातून आपले भातपिक कृषी सहाय्यक रंजना भोईर यांच्या समोरच पेटऊन देऊन संताप व्यक्त केला.

या गावातील वसंत गणपत मोकाशी (40 गुंठे) योगेश मोकाशी (30 गुंठे), विनायक मोकाशी (20गुंठे), कृष्णा मोकाशी (40गुंठे), तुकाराम मोकाशी (40गुंठे), विजय मोकाशी (20 गुंठे), मंगूलाल मोकाशी (5 एकर), नारायण लहू मोकाशी, दीपक मोकाशी (3 एकर), गजानन मोकाशी (30गुंठे), दत्तत्रेय मोकाशी, गणपत श्रीपद मोकाशी, शंकर काळुराम मोकाशी या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. एका तुसे गावातीलच जवळपास 50 ते 60 टक्क्यांच्या वर भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे गावातील शेतकऱ्यांनी सांगितले. 

वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.येथील बहुतांश भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी भातशेतीवर आवलंबुन आहेत. भातशेती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध सेवा सहकारी सोसायट्या,बँका तसेच खाजगी कर्ज घेऊन शेती करत असतात. महागडी खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च, निसर्गाचा हा लहरीपणा या सर्व बाबींनमुळे शेती करणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या दोन महिण्यापासून पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास निघुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कुटुंबाचे पालनपोषण व मुलांचे शिक्षण करायचे कसे असा प्रश्न शेतका-यांपुढे पडला आहे.

दरम्यान संपूर्ण तालुक्यात अशीच परिस्थिती असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीवर अनेक पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आंदोलने, निवेदने दिली असूनही अलिकडेच शासनाने दुष्काळी यादी जाहिर केली या यादीमध्ये वाडा तालुक्याचे नाव नसल्याने शासनाच्या या धोरणाचा विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष 
तुसे येथील शेतकऱ्यांनी महसुल व कृषी विभागाकडे तक्रारी करून भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती.मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्यशासनाकडून आदेश आल्यानंतर नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात येतील. 
विठ्ठल गोसावी, नायब तहसीलदार वाडा 

माझ्या साडेतीन एकराच्या भातशेतीतील संपूर्ण पीक नष्ट झाले असून भातपिक लागवडीसाठी मी तुसे सेवा सहकारी सोसायटीचे 85 हजाराचे कर्ज घेतले आहे. भात पिक तर गेले आता कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न माझ्या समोर आहे. 
अशोक मोकाशी, बाधित शेतकरी 

जिल्हाधिका-यांनी नुकसानीचे आदेश दिल्यास पंचनामे तत्काळ करण्यात येतील. 
माधव हासे, तालुका कृषी अधिकारी, वाडा 

Web Title: Farmers of the wada put farm on fire