संवाद यात्रेत शेतकरी जाब विचारतील - पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला.

श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला.

कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्री टीका करीत असले, तरी या यात्रेची सरकारने दखल घेतली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रेची घोषणा केली.'' ""चांगले काम झाल्याने जनतेने आम्हाला मतदान केले. त्यामुळे आघाडी सरकार 15 वर्षे होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी, जनता पक्ष याप्रमाणे मोदी यांची लाट होती. परिणामी, भाजपला सत्ता मिळाली,'' असे सांगून पवार म्हणाले, 'लोकशाही मार्गाने तुम्ही जिंकला. त्याला आता अडीच वर्षे झाली. किती दिवस विरोधकांच्या नावाने बोटे मोडणार, त्यांच्या नावाने पावत्या फाडणार?''

'कांदा-तुरीची काय अवस्था आहे? त्यावर झालेला खर्चही निघत नाही. कर्जापायी शेतकरी, त्याचे कुटुंबीय आत्महत्या करीत आहेत, ही बाब सर्वांनाच कमीपणा आणणारी आहे. ताठ मानेने जगण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यासाठीच म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी समविचारी पक्षांसह संघर्ष यात्रा काढली. त्यात कोणतेही राजकारण नाही,'' असेही पवार म्हणाले.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता, याची आठवण करून देऊन पवार म्हणाले, 'आता पुन्हा ती वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने 30 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज माफ करावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. तसे न करता संघर्ष यात्रेवर टीका केली जात आहे.'' या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers will ask for a yatra