दिलासादायक : शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत डीपी!

Farmers will get high pressure independent electric DP
Farmers will get high pressure independent electric DP

माढा (सोलापूर) : कृषी विद्युतपंपाना उच्च दाब वितरण प्रणालीद्वारे (एच. व्ही. डी. एस.) स्वतंत्र विद्युत जनित्रासह वीजजोड देण्यात येत असल्याने विजेचा दाब कमी-जास्त होणे यामुळे बंद होणार असून वीजगळतीही नियंत्रणात येणार आहे. वीजगळती, वीजचोरी या प्रकाराला आळा बसणार आहे.
वीज वितरण कंपनीकडून राज्यामध्ये सध्या कृषी विद्युत पंपांना एल. टी. प्रकारातील वीजजोड देण्याची प्रक्रिया सुमारे वर्षभरापासून बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे कृषी पंपांना वीज जोडणी देण्यामध्ये अडचणी येत आहेत. मात्र वीज वितरण कंपनीने एच. व्ही. डी. एस. प्रणालीद्वारे कृषी विद्युत पंपांना वीज जोड देण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. 

हेही वाचा- माढ्यात भाजपची ताकद क्षीण... हे आहे प्रकरण
शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज

या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विद्युत जनित्र ( डी.पी. ) दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या अश्वशक्तीप्रमाणे वीज वितरण कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून कोटेशन भरावे लागते.  शेतकऱ्यांना केवळ अश्वशक्ती प्रमाणे कोटेशनचा खर्च भरावा लागणार आहे. विद्युत जनित्र, त्याची उभारणी याबाबतचा सर्व खर्च वीज वितरण कंपनीने नेमलेले ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगळा खर्च करायचा नाही. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज जोड मिळाल्यामुळे विदयुत दाब कमी-जास्त होऊन विद्युतपंप जळणे, पाणी उपसा करण्यामध्ये अडथळा निर्माण होणे यासारख्या गोष्टी टळणार आहेत. मात्र अशा कृषी पंपांना मीटर प्रमाणेच वीजबिल आकारले जाणार आहे. तसेच वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, प्रसंगी विद्युत जनित्रही काढून नेली जाऊ शकतात. पूर्वी अश्वशक्ति प्रमाणे वीज बिल येत असल्यामुळे विजेचा कमी अधिक वापर शेतकर्‍यांना करता येत होता आता मात्र शेतकऱ्यांना मीटर प्रमाणे विज बिल येणार असल्याने नियंत्रित प्रमाणातच विजेचा वापर करावा लागणार आहे.
यामुळे कृषी पंपाचे शेतकर्‍यांना नियमित वीज बिल भरावे लागण्याची शक्यता आहे. या प्रणालीद्वारे विद्युत पंप मिळण्यासाठी अर्ज केलेल्या माढा तालुक्यातील ५०९ कृषी वीजग्राहकांपैकी ३१७ वीजोड देण्यात आले आहेत. मात्र बऱ्याच विद्युत पंपांचा वीजपुरवठा अद्याप सुरू केलेला नाही.

हेही वाचा- लेझर शोद्‌वारे उलगडले श्री सिद्धेश्‍वरांचे जीवनचरित्र
नव्या प्रणालीचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

  1. स्वतंत्र विद्युत जनित्र असल्याने पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार
  2. खंडित वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंप जळण्याचे प्रमाण बंद होणार
  3. नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार असल्याने शेती पिकांना पाणी देण्यातील अडचणी दूर होणार
  4. पूर्वी तारा वीजेचे खांब याचा खर्च शेतकऱ्यांना उचलावा लागत होता. आता या प्रणालीद्वारे विद्युत जनित्र उभारणीचा खर्च वीज वितरण कंपनीच करत आहे.
  5. पूर्वी काही शेतकऱ्यांनी वीज बिल भरले तरीही एखाद्या विद्युतजनित्राखाली असणाऱ्या सर्व कृषिपंपांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे तोडला जायचा. यामुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याची झळ बसायची ते यापुढे बंद होणार आहे.

वीज वितरण कंपनीसाठी फायदेशीर

  1. तांत्रिक व इतर गळती या प्रणालीमुळे थांबणार आहे.
  2. वीजबिल थकवणार्‍या नेमक्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे, विद्युत जनित्र काढण्याची कारवाई करता येऊ शकल्याने नियमित विज बिल भरले जाण्याची शक्यता आहे.
  3. विद्युत जनित्र उभारणी व जोडणी याचा मोठा खर्च वीज वितरण कंपनीला सोसावा लागणार असला तरी तांत्रिक व इतर वीजगळती बंद होऊन व नियमित वीज बिल भरणा मिळणार असल्याचा कंपनीला फायदा होणार आहे.
  4. प्रणालीमुळे वीज चोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे.
  5. पूर्वी अश्वशक्ति प्रमाणे वीजबिल आकारले जायचे आता मीटरप्रमाणे वीजबिल आकारले जाणार असल्याने कंपनीला ते फायदेशीर ठरणार आहे.

ठेकेदाराला पैसे देईचे नाहीत...

एच. व्ही.डी.एस. या नव्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोड देण्याचे काम सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांनी यासाठी कोणत्याही व्यक्तीला अथवा ठेकेदाराला पैसे द्यायचे नाहीत. याबाबतचा सर्व खर्च ठेकेदार करणार आहेत. या प्रणालीमुळे चांगल्या विद्युत दाबाने कृषिपंपांना वीजपुरवठा होणार आहे. टेक्निकल व नियमित वीजगळती ही थांबणार आहे. मार्चअखेरपर्यंत या प्रकारातील प्रतीक्षा यादीवरील उर्वरित १९२ कृषीग्राहकांना वीजोड देण्यात येणार आहेत. काही ठिकाणी तपासणीची कामे राहिल्याने या प्रणालीद्वारे वीजोड दिलेले नाहीत. ते तातडीने देण्याचा प्रयत्न करणार आहे.

 -  महेश लोखंडे, उपकार्यकारी अभियंता,
वीज वितरण कंपनी, माढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com