शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणारच - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

गारगोटी - शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील सरकारला जागे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणारच. शेतकऱ्यांचा सात- बारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मुदाळ (ता. भुदरगड) येथे संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. प. बा. पाटील शैक्षणिक संकुलात ही सभा झाली.

अजित पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकार केवळ आश्वासने देणारे आहे. सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी जनतेसह विविध समाजातील लोकांना आश्वासने दिली. त्यांची पूर्तता झाली नाही. आता त्यांनी कृतीवर भर द्यावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्य राज्याच्या धोरणांचा अभ्यास करण्यापेक्षा सात-बारा कोरा केल्याचा निर्णय जाहीर करावा; अन्यथा शेतकरी त्यांना जागा दाखवतील.’’

ते म्हणाले, ‘‘शिवसेना आणि स्वाभिमानी पक्ष सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेत असल्याचे दाखवत असले, तरीही त्यांची भूमिका शेतकरीहिताची नाही.’’  

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘भाजपचे नेते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते आळशी बनतील, अशी बेताल वक्तव्ये करतात. यातूनच नेत्यांची व पक्षाची भूमिका लक्षात येते. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजप नेत्यांनी करू नये.’’

माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांची भाषणे झाली. आमदार रोहिदास पाटील, आमदार अमर काळे, आमदार वसंत चव्हाण, महापौर हसीना फरास, आमदार सतेज पाटील, आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार मोहनराव कदम, सुनील केदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, नामदेवराव भोईटे, युवराज पाटील, रणजित पाटील, पंडितराव केणे, जीवन पाटील, विकास पाटील, विश्वनाथ कुंभार आदी उपस्थित होते. बी. एन. पाटील-मुगळीकर यांनी आभार मानले. पी. जी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

ठाकरे, शेट्टी यांच्यावर टीका
शिवसेना नेते उद्धव ठाकरे, खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करीत अजित पवार व राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचा हास्यास्पद उल्लेख करीत खिल्ली उडविली. याच वेळी सधन शेतकऱ्याची व्याख्या करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.

Web Title: The farmers will have 7/12 blank