esakal | भात मळण्यांनी घेतलाय वेग ; ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धावपळ
sakal

बोलून बातमी शोधा

the farming working fastly in belgaum but rain atmosphere also change in balgam

कापून ठेवलेले भातपीक गोळा करण्याची घाई शेतकऱ्यांत असून काहीजण घाईगडबडीने मळण्याही उरकून घेत आहेत.

भात मळण्यांनी घेतलाय वेग ; ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धावपळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ऐन सुगीच्या तोंडावर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची शिवारात लगबग होती. कापून ठेवलेले भातपीक गोळा करण्याची घाई शेतकऱ्यांत असून काहीजण घाईगडबडीने मळण्याही उरकून घेत आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने सर्वच पिके चांगली आली आहेत. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे काही ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. दोन वर्षांपासून सलग पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या सुगी हंगामात पेरणी केलेले भात, भुईमूग, रताळी, बटाटे काढण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. यंदाही पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावल्याने भातकापणी लांबली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप दिल्याने हातातोंडाला आलेली पिके घरी घेऊन येण्यासाठी शेतकऱ्यांची बांधावर धांदल उडाली आहे.

हेही वाचा - चालत्या रोरो वरून ट्रक कोसळला अन्...
 

तालुक्‍यातील येळ्ळूर, धामणे, कणबर्गी, बेळगुंदी, उचगाव, किणये, कडोली, सांबरा भागांतील बहुतांश भात कापणीची कामे उरकली आहेत. काहींनी मळण्याही उरकून घेतल्या आहेत, तर काहींनी भाग कापून ठेवले आहे. दिवाळीच्या तोंडावर मजूर मिळत नसल्याने काहींची भात कापणी करणे शिल्लक आहे. भात कापणी केलेल्या शिवारात आता रब्बी हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कापून ठेवण्यात आलेल्या भाताची गंजी घालण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून शेतकरी आपल्या कुटुंबीयासह व्यस्त होते, तर ढगाळ वातावरणामुळे बहुतेक जणांनी भात कापणी पुढे ढकलली आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते.

"सध्या शिवारात सुगी हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. भात कापणी, मळणी, गंजी घालण्याचे काम असतानाच अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकावर पाणी फिरण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतातील कामे उरकून घेतली जात आहेत."

- राजू मरवे, शेतकरी

संपादन - स्नेहल कदम