दारु पिऊन त्रास देतो म्हणून केला मुलाचाच खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

- बार्शीतील घटना 
- मद्यप्राशन करून कुटुंबाना दिला त्रास 

बार्शी : घरी दररोज रात्री मद्यप्राशन करून मुलगा कुंटुंबातील सर्वांना त्रास देतो म्हणून14 जुलै रोजी रात्री मद्यप्राशन करून आलेल्या मुलास फोकाने मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या वडिलांस पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी संशयीत आरोपीस बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पोपट चंद्रकांत जगदाळे (वय 35) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून चंद्रकांत राजाराम जगदाळे (वय 67, रा. उपळाई रोड, चव्हाण प्लॉट) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. ही घटना 15 जुलै रोजी पोपटचे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर उघडकीस आली. पोपट जगदाळे 14 जुलै रोजी मद्यप्राशन करून घरी येताच चंद्रकांत जगदाळे यांनी त्यास फोकाने मारहाण केली. त्याचा गळा दाबला. त्यास कॉटवर झोपवले. तो निपचीत पडला होता. हालचाल करेना म्हणून लहान मुलास बोलावून खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी पोपट यांस मृत घोषित केले.

वडिल चंद्रकांत यांनी पोपटने घरामध्ये स्टोलने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता पोपटच्या अंगावर जखमा होत्या. गळ्यावर वृण व गळा काळानिळा झाला होता. मुलाची आई लता जगदाळे व पोपटचा मुलगा प्रथमेश (वय 10) यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पोपटला चंद्रकांत यांनी मारहाण केली असल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. काळबांडे यांनी केली. गळा आवळून मृत्यू झाला असल्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. पोलिसांनी चंद्रकांत जगदाळे याच्यावर रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father arrested in Barshi due to his Sons Murder

टॅग्स