व्हायरल व्हिडीओमुळे सापडले हरवलेले बाबा! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 14 जून 2018

नव्वद वर्षीय भिकाजी पानसरे हे 7 फेब्रुवारी 2018 रोजी भायभळा येथून हरवले होते. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले आणि घरी परत गेलेच नाहीत. कुटुंबीयांनी मुंबईत अनेक ठिकाणी शोध घेतला, पण ते सापडले नव्हते. कुटुंबीयांनी आशा सोडली होती. पानसरे यांना मी जेवण खाऊ घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचे कुटुंबीय सोलापुरात आले. रमजानच्या महिन्यात पुण्यकाम झाल्याचे समाधान आहे. 
- नसरुद्दीन शेख, पोलिस हवालदार

सोलापूर : एका वृद्धाला पोलिस कर्मचारी जेवण खाऊ घालत असल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे वृद्धाच्या मुलींना त्यांचे हरवलेले बाबा मिळाले. मुंबईहून सोलापुरात येऊन मुलींनी आपल्या वडिलांना घरी नेल्याची सकारात्मक घटना घडली आहे. 

फौजदार चावडी पोलिस ठाणे अंकित मार्केट पोलिस चौकीत कार्यरत असलेले हवालदार नसरुद्दीन शेख हे नेहमीप्रमाणे 9 जून रोजी बेवारस वृद्धांना जेवण खाऊ घालत होते. कोणीतरी त्यांचा व्हिडीओ केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. पोलिसाची माणूसकी.. म्हणून हजारो लोकांनी तो व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओत दिसणारे आजोबा चार महिन्यांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाले होते. त्यांचे नाव भिकाजी पानसरे (वय 90, रा. भायखळा, मुंबई) असे आहे. पानसरे यांच्या कुटुंबीयांपर्यंत तो व्हिडीओ पोचला. व्हिडीओत पोलिसासोबत दिसणारे वृद्ध आपले वडीलच आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांची मुलगी मनाली पोटोळे यांनी पोलिस हवालदार शेख यांच्याशी संपर्क साधला. तुमचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ते वृद्ध माझे वडील आहेत असे सांगून मनाली यांनी आता माझे बाबा कुठे आहेत असे विचारले. शेख यांनी वृद्ध पानसरे यांचा शोध घेतो असे सांगितले. पानसरे हे सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील पायऱ्यांवर इतर बेवारसांसोबत बसले होते. त्यांना पोलिस चौकीत आणले. मंगळवारी (ता. 12) सकाळी पानसरे यांचे कुटुंबीय मुंबईहून सोलापुरात आले. हरवलेल्या बाबांना पाहताच त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले. सर्वांनी हवालदार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. पानसरे यांना प्राथमिक उपचार करून मुंबईला घरी नेण्यात आले आहे. 

हवालदार शेख यांचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी कौतुक केले आहे. राज्यातून हजारो लोकांनी फोन करून शेख यांचे कौतुक करून आभार मानले आहेत. 

नव्वद वर्षीय भिकाजी पानसरे हे 7 फेब्रुवारी 2018 रोजी भायभळा येथून हरवले होते. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले आणि घरी परत गेलेच नाहीत. कुटुंबीयांनी मुंबईत अनेक ठिकाणी शोध घेतला, पण ते सापडले नव्हते. कुटुंबीयांनी आशा सोडली होती. पानसरे यांना मी जेवण खाऊ घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचे कुटुंबीय सोलापुरात आले. रमजानच्या महिन्यात पुण्यकाम झाल्याचे समाधान आहे. 
- नसरुद्दीन शेख, पोलिस हवालदार

Web Title: father found for viral video in Solapur