बापरे! माकडाने हे काय केले? 

प्रशांत काळे 
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- बार्शी बसस्थानकावर हाहाकार 
- 15 प्रवाशांना घेतला चावा 
- वन विभागाला परिश्रमानंतर पकडण्यात यश
 

बार्शी : सकाळची दहाची वेळ.. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी.. बस पकडण्यासाठी धावपळ.. त्यातच एका माकडाचे सैरभैर होऊन या फलाटावरून त्या फलाटावर येणे- जाणे सुरू. एकाचा नाही, दोघाचा नाही तर तब्बल 15 प्रवाशांचा चावा या माकडाने घेतला. त्यातून पोलिस हवालदारही सुटू शकले नाहीत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माकडाला पकडण्यात यश मिळवले. 

न्यूझलंडला यायचंय तर 10 लाख आण 

सार्वजनिक ठिकाणी एखादा पशू- पक्षी आला तर त्याबद्दलचे मानवाच्या मनातील प्रेम किती जागृत होते, याचे उत्तम उदाहरण बार्शी बसस्थानकावर गुरुवारी पाहायला मिळाले. या माकडाला प्रवाशांनी केळी, सफरचंदासह अन्य खाद्यपदार्थ खायला दिले. प्रवाशांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माकड फळे, खाद्यपदार्थ खाऊन संपूर्ण बसस्थानकावर फिरत होते. याच वेळी प्रवाशांचीही मोठी तारांबळ होत होती. परंतु, काही प्रवाशांनी त्याच्याशी जास्त जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने चावा घेतला. 
बसस्थानकावर कार्यरत असलेले हवालदार तुकाराम पवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केला असता माकडाने त्यांच्या खांद्याचा व हाताचा चावा घेतला. हा सर्व प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. 

अन्‌ कंसमामाचे पितळ उघडे... 

 

बस, प्रवाशांचे येणे-जाणे सुरू होते. त्यातून काही प्रवाशी तसेच पोलिसांनी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. किमान या माकडाला सुरक्षितपणे पकडून बाहेर वनामध्ये नेऊन तरी सोडतील असा उद्देश यामागे होता. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नंतर मोबाईल बंद केल्याचे समजताच वन विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रार देण्यात आली, तेव्हा कर्मचारी पाठवण्यात येतील असे सांगण्यात आले. तोपर्यंत माकडाने मात्र सर्वांना जेरीस आणले होते. अखेर रात्री उशिरा वनक्षेत्रपाल एच. बी. कोकाटे, वनरक्षक जाधवर, आय. एस. पठाण, आयेशा शेख, वनपाल गव्हांदे, वन्यप्राणी मित्र यांनी सापळा लावून माकडाला पकडण्यात यश मिळवले. 

माकडावर उपचार करणार 
तक्रार प्राप्त झाली होती; परंतु पंढरपूर येथे वनरक्षक, वनक्षेत्रपाल, कर्मचाऱ्यांचे दोन दिवस ट्रेनिंग सुरू होते. ते संपताच ते बार्शीत पोचले. अथक प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता माकडाला सापळा लावून पकडले. योग्य उपचार करून माकडाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येईल. 
- एच. बी. कोकाटे, 
वनक्षेत्रपाल, बार्शी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father! What did the monkey do to it?

फोटो गॅलरी