Father's Day : ९३ वर्षांचा स्टायलिश बाप आणि त्यांच्या तीन मुली

Father's Day :  ९३ वर्षांचा स्टायलिश बाप आणि त्यांच्या तीन मुली

कोल्हापूर - यांचं नाव दशरथ कृष्णाजी सांगावकर. वय ९३. यांना सर्व जण दादा म्हणून ओखळतात. राजारामपुरीत मोठा बंगला. एकटे राहतात, त्याला घडलेही तसेच. पत्नीचे अकाली निधन झाले, मुलगा अपघाती गेला. तीन सोन्यासारख्या मुली विवाह होऊन आपापल्या घरी गेल्या. या परिस्थितीत ते घरात एकटेच कुढत बसत असतील, असेच वाटते. पण, या दादांच्या बाबतीत सारं उलटच आहे.

हे ९३ वर्षांचे दादा एकटे राहतात. सकाळी सहा-सव्वासहाला गाडी बाहेर काढतात. गाडीत एक मोठा बॉल असतो. विद्यापीठाच्या मैदानावर येतात. एकटेच या बॉलबरोबर खेळत व्यायाम करतात. घरी परत येतात. या वयातही मस्त टी शर्ट, जीन्स, डोक्‍यावर हॅट, चेहरा चकचकीत अशा फ्रेश लुकमध्ये वावरतात. या वयातही त्यांच्या मित्रांचा गोतावळा खूप आणि तिन्ही मुलींशी बाप म्हणून तर नाते आहेच, पण त्यांच्याशी ते एखाद्या मित्राप्रमाणे सुंदर नाते जपतात आणि हे अनोखे नाते जपत-जपत आनंदाने जगतात. 

हे सांगावकर दादा म्हणजे जुन्या जमान्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक. पुलाचे बांधकाम म्हटले, की त्यांच्या फर्मचे ‘आरसीसी बिल्डर’ हे नाव घेतले जायचे. त्यामुळे त्या काळात त्यांनी मोठमोठी कामे केली आणि ते स्थिरस्थावर झाले. पण, पत्नी सरोजिनी अकाली गेल्या. मुलगा भरत आयआयटीला होता. पण, तो अपघाती गेला. तीन मुली सुनीला, रोमा आणि मोनिका या विवाहानंतर आपापल्या घरी गेल्या. 

राजारामपुरीतल्या घरात ते एकटेच असतात. सोबतीला नोकर. पण, हे दादा आपल्या वाट्याला कधी एकटेपणा येऊ देत नाहीत. आता जवळच्या म्हटलं तर तीन मुलीच. पण, बाप म्हणून जगताना हे दादा ‘ऑलवेज हॅप्पी’ या पद्धतीने मुलींशी वागत राहतात. ९३ व्या वयातही ते मित्रमंडळींना गप्पाटप्पा, मैफलींसाठी बोलवत राहतात. ‘माझे मित्र पार्टीला येणार आहेत,

तुम्ही हातभार लावायला या’ म्हणून कोल्हापुरातच असलेल्या सुनीला व मोनिका या मुलींना हक्काने बोलावतात. मुलीही ‘या वयात पप्पा किती पार्ट्या’ असे लाडीकपणे रागावतात. ‘पप्पा, आता पेग बास’ असे प्रेमभरल्या डोळ्यांनी पप्पांना दरडावतात. यातला गमतीचा भाग सोडा. पण, आपले पप्पा या वयातही इतके आनंदी आहेत; तर आपण त्यांना पुढे असंच आनंदात का ठेवू नये, म्हणून या तीन लेकी आपल्या ९३ वर्षांच्या स्टायलिश बापाला सांभाळतात. 

बाप आणि लेकीचे नाते हे खूप वेगळे असते. वर-वर बाप कितीही तटस्थ कोरडा वाटत असला, तरीही त्याची नजर लेकींकडे लागून राहिलेली असते. वर-वर त्याला दाखविता आले नाही तरी त्याचे मन मुलींसाठी आतून कढत असते. लेकींचेही तसेच असते. त्या पप्पांवर प्रेम करतात. रागावत असतात. प्रसंगी बापाला दटावत असतात. पण, सासरी गेलेल्या मुलींच्या डोळ्यांतून बापाची आठवण पाझरत असतेच. सागावकर दादांचेही असेच आहे. ते घरात एकटे असले तरीही तिन्ही मुलींच्या नजरेची, मायेची पाखर त्यांच्यावर आहे. म्हणूनच ९३ वय असलेल्या आपल्या बापाला ‘हॅलो यंग मॅन’ म्हणायचे प्रेमाचे धाडस या मुलींत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com